घरमहाराष्ट्रनाशिकअपघातग्रस्तांमध्ये २३ टक्के चालक विनापरवाना

अपघातग्रस्तांमध्ये २३ टक्के चालक विनापरवाना

Subscribe

‘प्रादेशिक परिवहन’च्या अहवालातून उघड; मानवी चुकाच अपघातांना कारणीभूत

वाहनचालकांची बेशिस्त, वाहतुकीची कोंडी आणि ओबडधोबड मार्ग यामुळे रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. २०१५ ते २०१८ मध्ये रस्ते अपघातात ८३५ व जानेवारी ते मे २०१९ अखेर ४६ वाहनचालकांचे बळी गेले आहेत. शहरात दररोज किमान एका वाहनचालकाचा रस्ते अपघातात मृत्यू होत आहे. शहरातील रस्ते अपघातात २३ टक्के वाहनचालक विना परवाना असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या प्रदूषित शहरांच्या राज्यात यादीत नाशिक सहाव्या क्रमांकावर आहे. पेठ रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे मार्च २०१९ अखेर १६ लाख ७६ हजार ९७६ वाहनांची नोंद झाली आहे. त्यामध्ये १२ लाख ३७ हजार ६९२ दुचाकी वाहने असून २ लाख १८ हजार ५६० चारचाकी वाहने आहेत. त्यामुळे शहरात दुचाकीचालकांची संख्या लाखोंच्या घरात गेली आहे. मात्र, गतवर्षी रस्ता सुरक्षेकडे ९१ टक्के दुचाकीचालकांनी दुर्लक्ष केले. शहरात हेल्मेटचा वापर अनेक वाहनचालक करीत नाहीत. त्यामुळे मृत्युमुखी पडणार्‍या व्यक्तींच्या तुलनेत दुचाकीचालकांची संख्या ५८ टक्के आहे. शहर वाहतूक शाखेकडून वारंवार जनजागृती केली जात आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून दंड वसुली केला जात आहे. मात्र, दंड भरूनही बेशिस्त वाहनचालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करतात. चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडल्यामुळे पाच महिन्यांत १४ पादचार्‍यांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

आरटीओमार्फत वाहननोंदणीसह वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जात आहे. शहरातील अपघातात मृत, जखमी झालेल्यांची माहिती शहर पोलिसांकडून आरटीओकडे प्राप्त झाली आहे. त्यामध्ये अपघातात मृत झालेल्या २३ टक्के वाहनचालकांकडे परवाना नव्हता. सर्वाधिक अपघात भरधाव वेग आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे आरटीओ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

चुकीमुळे ९७ टक्के अपघात

बेशिस्त वाहनचालकांकडून वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात ९७ टक्के वाहनचालकांच्या चुकीमुळे अपघात झाले असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. वयानुसार २५ ते ३५ वयोगटातील वाहनचालकांचे मृत्यू सर्वात जास्त झाले आहेत. शिक्षणानुसार दहावी व त्यापेक्षा अधिक शिक्षण झालेल्या ४३ टक्के वाहनचालकांचा अपघाती मृत्यू झालेला आहे.

- Advertisement -

नियमांचे पालन काटेकोरपणे व्हावे

बेशिस्त वाहनचालकांकडून वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे रस्ते अपघात वाढत आहेत. आरटीओ विभागातर्फे वाहतूक नियम पाळण्याबाबत जनजागृती केली जात आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. – विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -