नाशिकमधील २९ क्लासेस विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित

अग्निशमन दलाच्या दुसर्‍या टप्प्यातील सर्वेक्षणातील निष्कर्ष; २३९ क्लासचालकांना विविध कारणांनी नोटीसा

Nashik
ClassFire
प्रातिनिधीक फोटो

सुरतमधील क्लासमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या अग्नीतांडवाच्या घटनेनंतर जाग आलेल्या नाशिक मधील अग्निशमन दलाने शहरातील २३९ क्लासचालकांना अग्निशमन उपाययोजना केल्या नसल्याचे कारण देत नोटीसा बजावल्या आहेत. दलाच्या दुसर्‍या टप्प्यातील सर्वेक्षणात आतापर्यंत २९ क्लासेसमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची व्यवस्थाच करण्यात आली नसल्याची माहिती पुढे आली आहे. . या सर्वांना ३० दिवसाच्या आत अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी दिली

सुरतमधील एका व्यापारी संकुलाला गेल्या महिन्यात आग लागून घडलेल्या दुर्घटनेत खासगी क्लासमधील २१ विद्यार्थ्यांच्या मृत्यु झाला होता. या दुर्घटनेनंतर खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही खासगी क्लासेसची संख्या मोठ्या प्रमाणावर आहेत. कोणत्याही शासकीय यंत्रणेची परवानगी न घेताच,गल्लोगल्ली घरात क्लासेस सुरू आहे. परंतु,या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षे संदर्भात कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये अग्निप्रतिबंधक सुरक्षा उपाययोजना आवश्यक असते.त्यामुळे महापालिकेने सुरत मधील घटनेची गंभीर दखल घेत, शहरातील खासगी क्लासेसमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना आहेत,की नाही याचे सर्वेक्षण सुरू केले होते. पहिल्या टप्प्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात २१० खासगी क्लासेस आढळून आले होते.सुटीच्या कालावधीत सर्वेक्षण केल्याने त्यात अनेक क्लासेसचे बंद असल्याचे आढळून आले. तरीही महापालिकेने सर्वेक्षणात आढळलेल्या २१० क्लासेसना नोटीसा बजावून त्यांना उपाययोजना करण्यासाठी ३० दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला होता. तसेच बंद क्लासेसच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होताच,दुसर्‍या टप्प्यात नव्याने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठी सहा विभागात सहा स्वतंत्र टीम स्थापन करण्यात आल्या आहेत. या सर्वेक्षणात आतापर्यंत २९ क्लासेस मध्ये अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे महापालिकेने या सर्व २९ क्लासचालकाना नोटीसा बजावल्या आहेत. आतापर्यंत नोटीस दिलेल्या क्लासेसची संख्या ही २३९ पर्यंत पोहचली आहे. अग्निशमन विभागाच्या या कारवाईमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला मदत होणार आहे.