जिल्ह्यात ३१ उमेदवारांचे अर्ज अवैध

२१२ उमेदवार निवडणूक रिंगणात; आता माघारीकडे लक्ष, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात छाननी प्रक्रिया पार

NASHIK
Nashik District

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातून २४३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले असून, या अर्जांची छाननी शनिवारी करण्यात आली. यात जिल्ह्यातील एकूण २४३ अर्जांपैकी २१२ अर्ज वैध ठरले, तर ३१ अर्ज अवैध ठरवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने दिली आहे.

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात शनिवारी छाननी प्रक्रिया पार पडली. अपूर्ण अर्ज तसेच डमी अर्ज अवैध ठरवण्यात आले. एकूण ३१ अर्ज अवैध ठरल्याने माघारीपूर्वी निवडणूक रिंगणात २१२ उमेदवार शिल्लक आहेत. मालेगाव बाह्य मतदारसंघातून सर्वाधिक पाच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्याखालोखाल बागलाण आणि सिन्नरमध्ये प्रत्येकी चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. यात प्रमुख उमेदवारांबाबत मात्र कोणतीही हरकत विरोधी उमेदवारांकडून नोंदवण्यात आलेली नाही. ७ सप्टेंबर रोजी सोमवारी माघारीची अंतिम मुदत असल्याने आता राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत.