सप्तश्रुंगी गडावरून परतणाऱ्या टेम्पोला अपघात; ४ जण ठार

सप्तशृंगी गड येथील श्री सप्तश्रुंगी देवीचा नवस फेडून परतणाऱ्या भाविकांच्या आयशर गाडीला दिंडोरी तालुक्यातील वणीनजीक झालेल्या भीषण अपघातात गाडीमधील ४ भाविक ठार, तर २० हून अधिक भाविक जखमी झाले.

Nashik
VaniAccident
भाविकांच्या याच टेम्पोला अपघात झाला.

सप्तशृंगी गड येथील श्री सप्तश्रुंगी देवीचा नवस फेडून परतणाऱ्या भाविकांच्या आयशर गाडीला दिंडोरी तालुक्यातील वणीनजीक झालेल्या भीषण अपघातात गाडीमधील ४ भाविक ठार, तर २० हून अधिक भाविक जखमी झाले. सोमवारी, १९ मेच्या मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

अपघातात ठार झालेले चारही भाविक २३ ते ३० वयोगटातील आहेत. रविवारी काही भाविक सप्तश्रुंगी गड येथे नवस फेडण्यासाठी गेले होते. तेथून रात्री उशिरा नाशिकला परतत असताना वणी गावानजीक असलेल्या कृष्णगाव शिवारत त्यांच्या आयशर गाडीचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने गाडी रस्त्यात असलेल्या गतिरोधकाजवळ थांबविली. मात्र, याच वेळी काही भाविक गाडीतून उतरत असताना पाठीमागून भरघाव आलेल्या ट्रकने आयशरला धडक दिली. त्यात चार जण जागीच ठार झाले. अपघातातील सर्व जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

मृतांची नावे अशी…

मृतांमध्ये सागर अशोक ठाकूर (२३), कुणाल कैलास ठाकूर (२५), गणेश भगवतीप्रसाद ठाकूर (३०) व आशिष माणिक ठाकूर (३०) यांचा समावेश आहे. चौघांपैकी तीन युवक हे पंचवटीतील पेठरोड येथील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर आशिष ठाकूर हे त्र्यंबकेश्वर येथील रहिवाशी होते.

जखमींची नावे अशी…

ललिताबाई अशोक ठाकूर. अनिल रमेश ठाकूर, माणिक चिंतुलाल ठाकूर, पल्लवी ठाकूर, ध्रुप ब्रिद्राबन ठाकूर, रंजिता ध्रुप ठाकूर आदी.