पक्षी निरीक्षणाची सुवर्ण संधी; नांदुरमध्यमेश्वरमध्ये ४० हजार पक्षी दाखल!!

नाशिककरांना पक्षी निरीक्षणाची सुवर्ण संधी चालून आली आहे. कारण, नांदुरमध्यमेश्वरमध्ये ४० हजार पक्षी दाखल झाले आहेत.

Nashik
spoon bill

नांदुरमध्यमेश्वर!! पक्षी निरीक्षणाची आवड असणाऱ्यांसाठी हक्काचं ठिकाण.  निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वरमध्ये सध्या देश – विदेशातील तब्बल ४० हजार पक्षी दाखल झाले आहेत. वनविभागाने शुक्रवारी केलेल्या पक्षी गणनेतून ही बाब उघड झाली आहे. यंदाची आकडेवारी पाहता पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय अशी वाढ झाली आहे.  सध्याच्या घडीला निफाड तालुक्यातील पारा चांगलाच घसरला आहे. त्यामुळे तापमान २ ते ३ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे. त्यामुळे सध्याचं वातावरण विदेशी पक्षांसाठी पोषक आहे. परिणामी, विदेशी पक्षांचे थवेच्या थवे नजरेला पडू लागले आहेत. रोसी स्टर्लीग पक्ष्यांचे यंदाच्या मोसमात लवकर आगमन झालं आहे. त्यामुळे सुर्योदय आणि सूर्यास्तावेळी त्यांच्या आकर्षक कवायती डोळ्यांचे पारणे फेडतात. नाताळची सुट्टी असल्याने नाशिकरांना या परदेशी पाहुण्यांना पाहण्याची नामी संधी साधता येणार आहे.

विदेशी पक्षांचे दर्शन

मार्श हेरीयर, ओस्प्रे इगल हे शिकारी पक्षीही नांदुरमध्यमेश्वरमध्ये दाखल झाल्याने त्यांच्या चित्तथरारक हालचाली वन्यजीव छायाचित्रकारांना मोहिनी घालत आहेत. ओपेन बिल स्टॉर्क, स्पॉट बिल डक, ब्राम्हणी डक, व्हाईट आयबीज, ग्लॉसी आयबीज, कोम डक, जेकाना, लेसर व्हिसलिंग डक, मलार्ड, पोचार्ड, गढवाल, नॉर्दन शाउलर, पिनटेल, रेड क्रिस्टेड पोचार्ड आदी प्रजातींचे ४० हजार पक्षी सध्या या अभयारण्यात डेरे दाखल झाले आहेत.

४० हजार पक्षी दाखल  

यंदा तब्बल ४० हजार पक्ष्यांची नोंद करण्यात वनविभाग आणि पक्षी मित्रांना यश आल्याचे राउंड ऑफिसर अशोक काळे यांनी सांगितले आहे. २४ प्रकारच्या माशांच्या प्रजाती व चारशेहून अधिक वनस्पती येथे आढळल्या आहेत. विशेष म्हणजे शंभर पेक्षा अधिक ग्रेटर फ्लेमिंगो नजरेस पडले आहेत. तर, कॉमन क्रेनच्या थवेच्या थवे नांदूरमध्यमेश्वरचे आभाळ व्यापून टाकत आहेत. पक्षी गणनेत वनपाल अशोक काळे यांच्यासह अश्विनी पाटील, पक्षी मित्र आनंद बोरा, डी. डी. कडाळे, डॉ. उत्तम डेर्ले, गाईड अमोल डोंगरे, शंकर लोखंडे, अमोल दराडे, प्रमोद दराडे, पंकज चव्हाण, रोषण पोटे, रमेश दराडे, विकास गारे,  गंगाधर अघाव, किरण बेलेकर आदि सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here