घरमहाराष्ट्रनाशिकश्रावण सोमवार तिसर्‍या फेरीच्या दिमतीला एसटीचे 80 अधिकारी

श्रावण सोमवार तिसर्‍या फेरीच्या दिमतीला एसटीचे 80 अधिकारी

Subscribe

इदगाह मैदानावरून एसटी महामंडळ येत्या रविवारी त्र्यंबककडे जादा गाड्या सोडणार

एसटी महामंडळाने तिसर्‍या श्रावणी सोमवारच्या त्र्यंबकेश्वर फेरीचे नियोजन पूर्ण केले आहे. यंदा एसटीने 300 जादा गाड्या सोडताना गत वर्षाच्या तुलनेत 25 अधिक गाड्या वाढविल्या आहेत. तसेच इदगाह मैदानावर उभारण्यात येणार्‍या बसस्थानकावर सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.तीन पाळ्यांमध्ये कर्मचार्‍यांच्या ड्युटी लावलेल्या आहेत. त्यासाठी एसटीचे पर्यवेक्षीय आणि अधिकारी दर्जाचे 80 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे.

एसटीच्या जादा गाड्या सोडताना महामंडळाच्या वाहतूक विभागाने चार मार्ग निश्चित केले आहेत. त्यात नाशिक येथून इदगाह मैदान ते त्र्यंबकेश्वर, पहिनेबारी ते त्र्यंबकेश्वर, अंबोली ते त्र्यंबकेश्वर, खंबाळे ते त्र्यंबकेश्वर या मार्गाचा समावेश आहे. त्यात पहिने, अंबोली, खंबाळे येथून खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वरकडे जाण्यास दोन दिवस बंद असणार आहे. त्यामुळे शिवभक्तांना एसटीच्या गाड्यांशिवाय दूसरा पर्याय प्रवासासाठी असणार नाही.

- Advertisement -

गेल्या वर्षी एसटीने तिसर्‍या श्रावणी सोमवारच्या फेरीसाठी त्र्यंबकला जादा 275 गाड्या सोडलेल्या होत्या. यातून लाखो शिवभक्तांनी प्रवास केल्याने एसटीच्या उत्पन्नात लक्षावधींची भर पडली होती. यंदा त्र्यंबकला चांगला पाऊस झालेला असल्याने फेरीचा मार्ग सुकर झालेला आहे. त्यामुळे फेरीला शिवभक्तांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महामंडळाने 300 जादा गाड्या निश्चित केलेल्या आहेत.

इदगाह मैदानावरून एसटी महामंडळ येत्या रविवारी (दि.18) त्र्यंबककडे जादा गाड्या सोडणार आहे. त्या व्यतिरिक्त नियमित वेळापत्रकाच्या गाड्या जुने सीबीएस येथून सुटणार आहेत. इदगाह मैदानावर तात्पुरते बसस्थानक म्हणून शामियाना उभारण्यात येणार आहे.त्याचबरोबर शिवभक्तांच्या रांगा लावण्यासाठी बैरिकेड लावून व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिकेकडून येथे फिरते शौचालय उभारण्यात येणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर उभा करण्यात येणार आहे. भाविकांना बसण्यासाठीही येथे व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येथे होणार्‍या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. महावितरणचा वीजपुरवठा खंडीत झाला तर जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

महापालिकेने दिले इदगाह मैदान निःशुल्क

महापालिकेने एसटी महामंडळाला त्र्यंबककडे जादा गाड्या सोडण्यासाठी इदगाह मैदान निशुल्क वापरण्यास दिले आहे. त्याचबरोबर येथे भाविकांना मुलभूत सुविधा देताना फिरते प्रसाधनगृह उपलब्ध करून दिलेले आहे. स्मार्टरोडच्या कामामुळे जुने सीबीएस आणि बांधकामामुळे मेळा बसस्थानक वापरता येत नसल्याने महामंडळाने मनपाला मैदान वापरण्यास देण्याची विनंती केली होती. मनपा आयुक्तांनी मैदान वापरण्यास देताना निशुल्क दिल्याने एसटी महामंडळाची सोय झाली आहे. – उत्तम पाटील, प्रभारी विभागीय वाहतुक अधिकारी, एसटी महामंडळ, नाशिक विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -