शहरातील ८३ क्लासेसची सुरक्षा ‘रामभरोसे’

महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून नोटिसा; २१० क्लासेसचे सर्व्हेक्षण

ClassFire
प्रातिनिधीक फोटो

नाशिक शहरातील ८३ क्लासेसची सुरक्षा रामभरोसे असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाने केलेल्या सर्व्हेक्षणातून पुढे आली आहे. या सर्व क्लासेसला नोटीस देत अग्निशमन उपाययोजना करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे.

सूरतमधील अग्नितांडवाच्या दुर्घटनेनंतर शहरातील धोकादायक स्थितीत सुरू असलेल्या क्लासेसचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाने मध्यवर्ती भागासह पंचवटी, नवीन नाशिक, सातपूर, नाशिकरोड विभागातील २१० क्लासेसचे सर्व्हेक्षण केले. त्यापैकी ८३ क्लासेसमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजनाच केल्या नसल्याचे आढळले. दरम्यान, आजही नवीन नाशिक, रविवार कारंजा, अशोक स्तंभ, नाशिकरोड भागात अनेक खासगी क्लासेस हे अत्यंत अरुंद जागेत घेतले जात असल्याचे चित्र आहे. अरुंद आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था नसलेले जिने, जिर्ण इमारती, वाडे अशा ठिकाणीदेखील क्लासेस सुरू आहेत. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून चाललेला हा उद्योग पालकांच्या मनात धडकी भरवणारा ठरतो आहे. ही परिस्थिती लक्षात घेत अग्निशमन दलाने सर्व्हेक्षण केल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख एस. के. बैरागी यांनी दिली.

सूरतमधील घटनेनंतर जाग

गुजरातच्या सूरतमधील तक्षशीला आर्केड इमारतीला लागलेल्या आगीत १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. टेरेसवर डोम टाकून अनधिकृतपणे हा क्लास चालवला जात होता. खिडक्यांचा अभाव, अग्निशमन यंत्रणेची पूर्तता नसणे, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग नसणे हीदेखील विद्यार्थ्यांचा बळी जाण्यामागील प्रमुख कारणे होती. या घटनेचा धडा घेत खडबडून जाग्या झालेल्या अग्निशमन दलाने शहरातील खासगी क्लासेसचे सर्व्हेक्षण हाती घेतले होते.

टेरेस, बेसमेंटला परवानगी नाहीच

शहराच्या काही भागांत इमारतींच्या बेसमेंट आणि टेरेसवरदेखील खासगी क्लासेस सुरू आहेत. अशा अनधिकृत क्लासेसला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नसल्याचे बैरागी यांनी सांगितले. यानिमित्ताने विनापरवानगी चालणार्‍या क्लासेसचा गंभीर प्रश्न पुढे आला आहे.