भरपावसात आशा, गटप्रवर्तकांचे जेलभरो

भरपावसात इदगाह मैदानावर जमलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Nashik

आरोग्य विभागात कार्यरत आशा, गटप्रवर्तक महिला कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा कृती समितीच्या महिलांनी सोमवारी (दि.8) जेलभरो आंदोलन केले. भरपावसात इदगाह मैदानावर जमलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

राज्यातील आशा-गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढीसह प्रलंबित मागण्यांबाबत कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवार (दि.3) पासून राज्यासह नाशिक जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांनी कामावर बहिष्कार टाकत उपोषणाला सुरूवात केली. आशा, गटप्रवर्तक महिलांनी उपोषण कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनी हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला उपोषणावर ठाम राहिल्या.


हे ही वाचा – जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे कामकाज ठप्प!


बुधवारी (दि. 4) महिलांनी लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन साकडे घातले होते. परंतू, शासनाकडून अद्यापही आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. यासाठी यापुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय राज्य कृती समितीच्या बैठकीत झाला. त्यानुसार शनिवारी (दि.7) गोल्फ क्लब मैदानाबाहेर आशा गटप्रवर्तक महिला कर्मचार्‍यांनी थाळीनाद आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले.

घोषणा देत वेधले लक्ष

आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून सोमवारी जेलभरो आंदोलन करत महिलांनी शासनाचा निषेध नोंदवला. यावेळी कर्मचार्‍यांनी मानधन मिळालेचे पाहिजे, शासनाला जाग आलीच पाहिजे अशा घोषणा देत लक्ष वेधले. शासनाने त्वरित दखल घ्यावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आयटक संलग्न आशा व गट प्रवर्तक संघटनेचे राज्याध्यक्ष राजू देसले यांनी दिला.