रामेश्वर-वाखारी रस्त्यावर दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

रात्री उशिरा देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस पाटील योगेश गुंजाळ यांनी दिली

Bike accident
Bike accident

देवळा : तालुक्यातील रामेश्वरफाटा ते वाखारी रस्त्यावर तुळजाई लॉन्सजवळ गुरुवारी (दि ९) रात्री अज्ञात वाहनांच्या धडकेत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी होऊन ठार झाला. या घटनेचा रात्री उशिरा देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस पाटील योगेश गुंजाळ यांनी दिली.

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील रामेश्वर फाटा ते वाखारी रस्त्यावर तुळजाई लॉन्सजवळ गुरुवारी (दि. ९) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास वाखारी (ता. देवळा) येथील मजूर राकेश दामू अहिरे (वय २६) हा युवक आपल्या दुचाकी (MH 41 AV 9353) ने घरी जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाला. या घटनेची खबर येथील पोलीस पाटील योगेश गुंजाळ यांनी देवळा पोलीस ठाण्यात दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर पोलीस पाटील योगेश गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते चेतन गुंजाळ, वाखारी नितीन ठाकरे, श्याम पवार आदींच्या मदतीने मयत राकेश अहिरे याला देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन शवविच्छेदन करण्यात आले. अपघातात सदर युवक गंभीररित्या जखमी झाल्याने त्याची ओळख पटविणे अवघड झाले होते. मात्र त्याच्याकडील मोबाइलवरून उपस्थितांनी संबंधित युवकाच्या नातेवाईकांशी संपर्क साधून ओळख पटली. मयत अहिरे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुलगी असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शरीफ शेख करीत आहेत.