कृषी केंद्रांचा अजब फतवा; हमीपत्र, धनादेश द्या मगच खते, बियाणे घ्या !

ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर नाशिकमधील देवळा तालुक्यातील दुकानदारांचा निर्णय

Deola, Nashik
छायाचित्र प्रातिनिधीक

लांबलेला मॉन्सून आणि सलग दुसऱ्या वर्षीही असणारे टंचाईचे सावट, सोसायट्या आणि बँकांकडून होणारी पीक कर्जासाठी अडवणूक, यामुळे आधीच खासगी सावकारीच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना आता कृषी सेवा केंद्रचालकांच्या या अजब फतव्याला सामोरे जावे लागणार आहेशेतकऱ्यांना हमीपत्र व धनादेश घेतल्या शिवाय खते व बियाणे यांची विक्री न करण्याच्या नवीन निर्णय देवळा तालुका ऍग्रो डिलर्सअसोसिएशनच्या वतीने घेण्यात आलादुष्काळाशी दोन हात करत असलेल्या शेतकऱ्यांना ऐन खरिपाच्या तोंडावर देवळा ऍग्रो असोसिएशनने मोठा धक्का दिला दिल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.

शेती पिकासाठी लागणारे बियाणे, खते, औषधे पीक निघेपर्यंत उधारीत या पद्धतीने विश्वासावर शेतकरी व कृषी निविष्ठा विक्री करणारे परवानाधारक यांच्यात व्यवहार होतात. मात्र काही शेतकरी पीक निघाल्यानंतर ही उधारीचे पैसे देण्यास टाळाटाळ करतात. शेतकरी वर्गाकडे दुकानदारांची करोडो रुपयांची थकबाकी झाली आहे. पैशाची मागणी केली असता शेतकऱ्यांकडून अनेक कारणे सांगितली जातात कधी तर हमरी तुमरी होते. त्यानंतर शेतकरी दुसऱ्या दुकानदाराकडे आपली उधारी सुरू करतो त्यामुळे पहिली उधारी तशीच राहून जाते, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

यावर तोडगा म्हणून सर्व परवानाधारक दुकानदारांकडे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या नावांची लिस्ट दिली जाणार आहे त्यात कुठलाही थकबाकीदार शेतकरी बी बियाणे किंवा औषध घेण्यासाठी दुकानात आला असता त्याला मालविक्री करायचा नाही. कृषी निविष्ठा परवाना धारक दुकानदार माल भरण्यासाठी विविध बँकांकडून कर्ज काढून व कंपन्यांकडून उधारीने खरेदी करत असतात. शेतकऱ्यांकडे थकबाकी वाढल्याने दुकानदारांची थकबाकी वाढली आहे. त्यात कंपन्यांनी पैसे वसुलीसाठी दुकानदारांकडे तगादा लावला असून काही दुकानदारांवर न्यायालयात गुन्हे दाखल केले असल्याने शेतकऱ्याचे जामीन म्हणून हमीपत्र व धनादेश घेऊनच माल उधारीवर द्यावा या संदर्भात सोमवार दिनांक १० रोजी बैठक घेऊन निर्णय घेण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष तुषार वाघ यांनी दिली.

या बाबत शेतकऱ्यांची बाजू जाणून घेतली असता धक्कादायक चित्र समोर आले. पीक निघेपर्यंत उधारीत घेतल्या जाणारे खते, बियाणे व औषधे या साठी काही दुकानदार अधिकचे पैसे आकारत असतात. बियाणे, खते, औषधे या वरती असलेली छपाई किंमत विक्री होणाऱ्या किमतीपेक्षा अधिक छापलेली असल्याने नक्की मूळ किंमत किती द्यावी हे शेतकऱ्यांना कळत नाही. जवळपास बऱ्याच दुकानात एकाच कंपनीचे खते, बियाणे, औषधे यांची वेगवेगळी किंमत मोजावी लागत असल्याने शेतकरी संभ्रम अवस्थेत सापडतो. मात्र रोखीने द्यायला पैसे वेळप्रसंगी नसल्याने उधारीवर मिळेल त्या किमतीत वस्तू खरेदी करावी लागते. बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्यास दुकानदार जबाबदारी घेत नाही.

निसर्गाने व बाजारभावाने साथ सोडली तर धनादेश वटविण्यासाठी पैसे आणायचे कुठून?
शेतमालास अत्यल्प बाजारभाव, दुष्काळी परिस्थिती, नापिकी या संकटांना सामोरे जात आहे. विविध कार्यकारी सोसायटी च्या माध्यमातून होणारा कर्ज पुरवठा आज स्थितीत बंद आहे. बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यात खरिपाचा तोंडावर हा फतवा निघाला आहे. येत्या खरीप हंगामात
धनादेश हमीपत्र देऊन बियाणे, खते घेतल्यावर पुन्हा निसर्गाने किंवा बाजारभावाने साथ सोडली तर धनादेश वटविण्यासाठी पैसे कुठून आणायचे?
– गंगाधर पवार , प्रगतशील शेतकरी भऊर ता. देवळा

तोडगा काढू
देवळा ऍग्रो असोसिएशनने घेतलेला निर्णय व शेतकऱ्याची आजची परिस्थिती बघता सक्ती करण्यापेक्षा कुठेतरी समन्वय साधून योग्य तोडगा काढण्यात यावा. जेणेकरून व्यापारी संकटात येणार नाही व येणाऱ्या खरीप हंगामात शेतकरीही अडचणीत येणार नाही.
-जगदीश पवार : संचालक, माफदा.

शेतकऱ्यांची बदमानी थांबवा, आम्हालाही हमीपत्र द्या
देवळा ऍग्रो असोसिएशनने घेतलेला निर्णय सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल करत एक प्रकारे शेतकऱ्यांची बदामी चालवली आहे, ती थांबवावी. गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने काही शेतकरी उधारी जमा करू शकले नाही म्हणून सरसकट सर्वांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नये.
बियाणे खराब झाल्यावर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते तेव्हा आम्हाला पण हमीपत्र द्या की बियाणे खराब निघनार नाही निघाल्यास अपेक्षित उत्पन्नाचे धनादेश बियाणे देतांना द्यावे.
-कृष्णा जाधव प्रहार शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष

ना नफा ना तोटा या तत्वावर शासनाने कृषी केंद्र स्थापन करावे.
ना नफा ना तोटा या तत्वावर प्रत्येक तालुक्यात शासनाच्या वतीने कृषी केद्र स्थापन झाले पाहिजे. योग्य दारात माल मिळाल्यास शेतकऱ्यांची लूट थांबेल व शेतकरी ही रोख वस्तु घ्यायला मागे पुढे पाहणार नाही.
मनोज पवार, युवा शेतकरी भऊर