घरमहाराष्ट्रनाशिकसातव्या आयोगासाठी कृषी विद्यापीठ कर्मचार्‍यांचा संप

सातव्या आयोगासाठी कृषी विद्यापीठ कर्मचार्‍यांचा संप

Subscribe

पिंपळगाव बसवंत : कांदा, द्राक्ष पिकांवरील प्रयोग थांबणार

पिंपळगाव बसवंत – २०१५ साली लागू झालेला सातव्या वेतन आयोगाचा लाभ अद्याप मिळाला नसल्याने राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कर्मचार्‍यांनी शनिवार (दि. ७) पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघानेदेखील बेमुदत संपाचे हत्यार उगारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष बागांसह इतर पिकांवर केल्या जाणार्‍या प्रयोगांना उशिर होणार आहे.

याबाबत माहिती अशी की, शासनाने २०१५ साली सातवा वेतन आयोग लागू केला. या आयोगाचा लाभ सर्वांना मिळाला. मात्र, पाच वर्षे होत आली तरी अद्याप राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील जवळपास १० ते १२ हजार अधिकारी व कर्मचार्‍यांनी ७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारीदेखील या आयोगापासून वंचित आहे. या आयोगाचा लाभ मिळावा, यासाठी नाशिक जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी देखील संपात सहभाग घेतला आहे. राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत येणार्‍या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, कुंदेवाडी, लखमापूरसह पिंपळगाव बसवंत येथील कांदा व द्राक्ष संशोधन केंद्रातील कर्मचार्‍यांनी २७ ऑक्टोबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले. परंतु, मागणीची दखल न घेतल्याने २ नोव्हेंबरपासून ५ नोव्हेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता फक्त स्वाक्षरी करून काम बंद आंदोलन पुकारले.

- Advertisement -

शुक्रवारी (दि. ६) सामूहिक रजा आंदोलन केल्यानंतर शनिवार (दि. ७)पासून मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनामुळे परिसरातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच, कांदा व द्राक्ष बागांवर केले जाणारे प्रयोगदेखील थांबणार आहे. या संपात सहायक प्राध्यापक डॉ. एम. पी. बडगुजर, वरिष्ठ लिपीक शांताराम चौरे, लिपीक बी. बी. डेर्ले, कृषी सहायक के. एन. जाधव, शिपाई आर. एस. खैरनार, माळी एस. बी. आव्हाड, पहारेकरी डी. डी. गवारे, मजूर सी. के. मोरे, डी. व्ही. खंबाईत, एस. व्ही. चव्हाण, के.एन. जाधव आदी सहभागी झाले आहेत.

ही कामे थांबणार

या संपामुळे शेतकऱ्यांना बांधावर जाऊन केले जाणारे मार्गदर्शन, कांदा, टोमॅटो, द्राक्षे, डाळिंब, भात, मका, गहू, सोयाबीनसह नाशिक जिल्ह्यात घेतल्या जाणाऱ्या पिकांवरील प्रयोग थांबणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांचेदेखील नुकसान होणार आहे.

मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन

पाच वर्षे होत आली तरी अद्याप आम्हाला सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही शनिवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उगारले आहे. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल. 
– डॉ. जितेंद्र ढेमरे, प्रभारी अधिकारी, कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत

 

शिष्टमंडळाकडून निवेदन सादर

सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा यासाठी ४ नोव्हेंबर रोजी राज्यातील चारही विद्यापीठांच्या कर्मचार्यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार, कृषीमंत्री दादा भुसे, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. मात्र, यावेळी झालेल्या चर्चेतून कुठलीच स्पष्टता दिसून आली नसल्याने आंदोलन पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय कर्मचारी समन्वय संघातर्फे घेण्यात आला आहे.
– डॉ. आर. बी. सोनवणे, सहायक प्राध्यापक, कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -