घरमहाराष्ट्रनाशिकअजंग अन् वडेल; गावं नव्हे सैनिकांची फॅक्टरी

अजंग अन् वडेल; गावं नव्हे सैनिकांची फॅक्टरी

Subscribe

एखाद्या तरुणाचा काही कारणाने मृत्यू झाला की गावातील अन्य तरुणही घाबरून जातात. मालेगाव तालुक्यातील अजंग आणि वडेल ही गावे यास अपवाद ठरली आहे. काही वर्षांपूर्वी गावातील गणेश गोविंद, मुरलीधर दुसाने आणि श्याम कुलकर्णी हे जवान देशसेवा करताना शहीद झाले. त्यांच्यावर लष्करी इतमात अंत्यसंस्कार करण्यात आल्याने दोन्ही गावांतील तरुणांचा उर भरून आला. तेव्हापासून सुरू झाली लष्करात भरती होण्याची स्पर्धा..

एखाद्या तरुणाचा काही कारणाने मृत्यू झाला की गावातील अन्य तरुणही घाबरून जातात. मालेगाव तालुक्यातील अजंग आणि वडेल ही गावे यास अपवाद ठरली आहे. काही वर्षांपूर्वी गावातील गणेश गोविंद, मुरलीधर दुसाने आणि श्याम कुलकर्णी हे जवान देशसेवा करताना शहीद झाले. त्यांच्यावर लष्करी इतमात अंत्यसंस्कार करण्यात आल्याने दोन्ही गावांतील तरुणांचा उर भरून आला. तेव्हापासून सुरू झाली लष्करात भरती होण्याची स्पर्धा.. अजंग आणि वडेल या गावांत आज अनेक तरुण लष्करात आहेत. तर शेकडो तरुण लष्करात जाण्यासाठी रोज पहाटेपासून सराव करतात. म्हणूनच ही दोन्ही गावे सैनिकांची फॅक्टरी म्हणून ओळखली जातात. देशसेवेची ऊर्मी बाळगून वाढलेल्या या ‘जुळ्या गावांची शौर्यगाथा खास प्रजासत्ताकदिनानिमित्त…

देशप्रेमाच्या गप्पा मारणारे खूप असतात; परंतु प्रत्यक्षात सीमेवर जाऊन लढण्याची इच्छाशक्ती बाळगणारे मात्र अगदीच कमी. मालेगाव तालुक्यातील अजंग व वडेल या गावातील तरुण याला अपवाद आहेत. लष्करात जाण्याची त्यांची इतकी प्रबळ इच्छाशक्ती आहे की, पहाटे यापैकी कोणालाच झोपेतून उठवावे लागत नाही. पहाटेची चाहूल लागताच असंख्य तरुणांची पावले घराबाहेर पडतात व तेथून सुरू होतो लष्करात भरती होण्यासाठीचा सराव. झुंजूमंजू पहाट झाली की, अजंग आणि वडेल गावात झपझप पडणार्‍या पावलांचा आवाज सुरू होतो. एकाच वेळी तब्बल दोनशे ते तीनशे तरुणांचे जत्थे पळण्याचा सराव करताना दिसतात. काही तरुण जोर, बैठका मारत असतात, तर काही पुलप्स काढताना दिसतात. ही सर्व तयारी लष्करात भरती होण्यासाठी असते. या दोन्ही गावांमधील ७० ते ८० जवान सध्या लष्करात कार्यरत आहेत. तर अनेक लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर गावाकडे पुन्हा वळले आहेत.

- Advertisement -

वडेलमधील ४० जवान लष्करात

अजंगची नदी ओलांडली की सुरू होते वडेल गावाची हद्द. १५ हजार लोकवस्तीच्या या गावात सध्या ४० ते ४२ तरुण लष्करात आहेत. लष्करात जाण्यास इच्छुक तरुण सराव करताना दिसतात.

अजंग गावात सैनिकांसाठी घरकुल योजना

नामपूर रस्त्यावर आठ हजार लोकवस्ती असलेले अजंग हे गाव. या गावातील ३० तरुण सध्या लष्करात आहेत. गावातील घरांची नावेही तेथील देशप्रेम अधोरेखित करतात. हिंदूस्थान, वंदेमातरम, सैनिक सन्मान अशी येथील घरांची नावे आहेत. ग्रामपंचायतीने माजी सैनिकांसाठी घरकुल योजनेचा अभिनव प्रयोग येथे केला आहे.

- Advertisement -

गोविंद कुटूंबियांना स्मारकाची प्रतीक्षा

अजंग गावात सध्या राहणारे; परंतु मूळ वडेलचे रहिवासी असलेले गोविंद कुटुंबीय आपल्या शहीद पुत्राच्या तसबिरीकडे बघत पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसतात. या कुटुंबातील गणेश बाळू गोविंद हे १३ जून २०११ मध्ये शहीद झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी व लष्करातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी गर्दी केली होती. यामुळे गावातील तरुणांचा लष्कराकडील ओढा कमी होईल, अशी भीती होती. झाले मात्र उलटेच. गणेशवर लष्करी इतमात झालेले अंत्यसंस्कार बघून गावातील इतर तरुणांचीही छाती फुगली. त्यामुळे त्यांनी देखील लष्करात जाण्याचा संकल्प केल्याचे गावकरी सांगतात. दुर्देवाने सहा वर्ष उलटले तरीही वडेल गावी गणेशचे स्मारक उभे राहीले नाही.

गावात गणेश गोविंद, मुरलीधर दुसाने आणि श्याम कुलकर्णी हे तरुण शहीद झाले आहेत. त्यामुळे लवकरच आम्ही गावात शहीद स्मारक बांधणार आहोत. – नरेंद्र सोनवणे, सरपंच, वडेल

आमच्या गावाला आम्ही २६ जानेवारीला आजी-माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करतो. यंदाही ही परंपरा पाळली जाणार आहे.  – अनिल बच्छाव, उपसरपंच, अजंग

अजंग अन् वडेल; गावं नव्हे सैनिकांची फॅक्टरी
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -