घरमहाराष्ट्रनाशिकमद्यपानामुळे महिलांमधील यकृतविकारात १२ टक्क्याने वाढ

मद्यपानामुळे महिलांमधील यकृतविकारात १२ टक्क्याने वाढ

Subscribe

महिलांमधील मद्यपानाचे प्रमाण वाढल्याने, गेल्या १० वर्षांत त्यांच्या यकृत विकारातही १२ टक्क्याने वाढ झाली आहे.

महिलांमधील मद्यपानाचे प्रमाण वाढल्याने, गेल्या १० वर्षांत त्यांच्या यकृत विकारातही १२ टक्क्याने वाढ झाली आहे. लहान शहरांच्या तुलनेत मोठ्या शहरांमध्ये हे प्रमाण गंभीर बनले असून, आजच्या जागतिक यकृत दिनानिमित्त पुढे आलेली ही बाब कुटुंबाचा कणा मानल्या जाणाऱ्या महिलांसाठी निश्चितच चिंताजनक आहे.

बदलती जीवनशैली, स्थुलता, फास्ट फूडचा अतिरेक, आहाराच्या अनियमित वेळा, व्यसनाधिनता आणि व्यायामाचा अभाव अशा कारणांमुळे विविध आजार जडत असतानाच, आता यकृताशी संबंधित (लिव्हर) आजाराच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे त्यात महिलांचे प्रमाणदेखील गंभीर असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट पुढे आले आहे. दहा वर्षांपूर्वी यकृत विकारग्रस्त प्रत्येक १०० रुग्णांमागे महिलांचे प्रमाण हे २ ते ५ टक्के होते. मात्र, हेच प्रमाण आता थेट १२ टक्क्यांपर्यंत जाऊन ठेपले आहे. साखर, भात आणि पिझ्झा-बर्गरसारख्या कॅलरीयुक्त पदार्थ्यांचे वाढलेले सेवन, व्यायामाचा अभाव आणि मद्यपान हेच याचे प्रमुख कारण असल्याचे अशोका मेडिकवर हॉस्पिटलमधील प्रसिध्द लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. सचिन डागा यांनी सांगितले. काहीही करा आणि कसंही वागा अशा बदललेल्या सामाजिक परिस्थितीमुळे आदरयुक्त भितीच राहिलेली नाही. त्याचाच परिणाम म्हणूनही महिलांमधील व्यसनाधिनता वाढून आजार बळावत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

शरीरातून विषद्रव्ये बाहेर काढणे, रक्त शर्करा तसेच चरबी (कोलेस्ट्रॉल)चे प्रमाण नियंत्रित ठेवणे यांसह रक्तस्त्राव झाल्यास तिथे लगेच खपली (क्लॉटस) तयार करणे अशी विविध महत्त्वपूर्ण कार्य यकृत करत असते. यकृतामध्ये समस्या उद्भवल्यास किंवा इजा झाल्यास अवघ्या ४८ तासांत यकृत स्वतःच त्याची दुरुस्ती करते. तसेच, ३ आठवड्यांत ८० टक्के इजा किंवा समस्या दूर करते. मात्र, धुम्रपान, मद्यपान, ड्रग्ज यामुळे यकृताची मोठी हानी होत असते. म्हणूनच या घटकांना दूर ठेवावे.

निरोगी यकृतासाठी…

आदर्श जीवनशैली, आहाराची नियमित वेळ, संतुलित व परिपूर्ण आहार, त्यात तृणधान्ये, प्रथिने, दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाज्या, भात तसेच कडधान्ये यांचा समावेश असावा. तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत. गाईचे शुद्ध तुप योग्य प्रमाणात घेतल्यास तेलाला उत्तम पर्याय ठरतो. लसुण, गाजर, हिरव्या पालाभाज्या, सफरचंद, अक्रोड यांसह लिंबू किंवा मोसंबी ज्यूस, सरबत उपयुक्त ठरते. हळदीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स तसेच, प्रो इन्फ्लामेटरी (सूज आणि दाह कमी करणारे) घटक असतात. हे घटक यकृताशी संबंधित आजारांमध्ये उपयुक्त ठरतात.

- Advertisement -

सल्ल्याविना औषधे नकोच

चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या मात्रेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सातत्याने वेदनाशामक किंवा अन्य कोणतेही औषधे घेतल्यास यकृतावर त्याचा विपरित परिणाम होत असतो. यकृत स्वस्थ ठेवायचे असल्यास स्वच्छ पाणी पिणे, रस्त्यावरील पदार्थांचे सेवन टाळणे, वैयक्तीक स्वच्छता आणि हिपॅटायटिस ए आणि बी यांच्यापासून दूर ठेवणार्‍या लसी घेणे फायदेशीर ठरते.

यकृतात पुनर्निर्माणाची क्षमता

यकृत हा शरीरातील असा अद्भूत अवयव आहे, ज्यात स्वतःचे नुकसान स्वतःच भरून काढण्याची क्षमता आहे. यकृतामध्ये एखादी समस्या उद्भवली किंवा इजा झाली तर ते अवघ्या ४८ तासांत बरी होते. तसेच, ७० टक्क्यांपर्यंत झालेले नुकसानदेखील ३ आठवड्यांत पुनर्निर्मितीच्या क्षमतेमुळे भरून निघते. व्यसनाधिनता व बदललेल्या जीवनशैलीमुळे हे नुकसान ७० टक्क्यांवर गेले की समस्या सुरू होतात. त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहून व्यसनांना दूर ठेवण्याची गरज आहे. – डॉ. सचिन डागा, लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन, अशोका मेडिकवर हॉस्पिटल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -