तब्बल ४८ वर्षांपूर्वीच्या आठवणींचा भरला मेळा

मोखाडा शाळेतील १९७१ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

Nashik
MauleKaka3
तब्बल ४८ वर्षांपूर्वीच्या आठवणींचा भरला मेळा

गांधी टोपी, धोतर घातलेले शिक्षक… अपूर्ण अभ्यासामुळे खाल्लेला मार.. शिक्षकांचा वचक, आधुनिक सुविधा नसल्या तरीही बागडण्याचा परिपूर्ण आनंद… अशा कितीतरी सुवर्ण क्षणांच्या आठवणींचा मेळावा मोहाडी गावातील के. आर. टी हायस्कूलच्या परिसरात भरला. या शाळेतील १९७१ च्या बॅचचे म्हणजे तब्बल ४८ वर्षापूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे हे कवित्त्व.

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी या गावात १९७०-७१ मध्येसाली अकरावीच्या वर्गात असलेले मित्र पुढील शिक्षण, रोजगार अशा विविध कारणांमुळे गावातून बाहेर पडले. त्यानंतर तब्बल ४८ वर्षांनी भेटले तेव्हा नातवंडांचे धनी झालेल्या या ज्येष्ठ विद्यार्थ्यांना पुनर्भेटीची ओढ लागली. त्याचे कारणही मोठे रंजक ठरले. पोलीस दलातून निवृत्त झालेल्या साहेबराव मौले यांची सतीश कुलकर्णी आणि चंद्रकांत खांबेकर यांच्याशी नाशिकमधील एका कार्यक्रमात भेट झाली. त्याचवेळी त्यांनी आपल्या अकरावीतील वर्गमित्रांना एकत्र आणण्याचा निश्चय केला आणि थेट गावी जाऊन विद्यार्थ्यांची माहिती मिळवली. चार महिन्यांच्या प्रयत्नांनंतर बहुतांश विद्यार्थ्यांशी संपर्क झाला आणि भेटीची तारीख, वेळ आणि ठिकाणही ठरले.

MauleKaka
तब्बल ४८ वर्षांपूर्वीच्या आठवणींचा भरला मेळा

मोहाडी गावातील ज्या ठिकाणी एक वर्ग भरत असे त्या मारुती मंदिरात हा स्नेहमेळा आयोजित करण्यात आला. तेव्हाच्या बॅचमध्ये 41 मुले आणि 4 मुली होत्या, त्यापैकी 24 विद्यार्थी आणि 3 मुली या स्नेहमेळ्याला उपस्थित होते. मंदिराचा जीर्णोद्धार करणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण जाधव यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. तेव्हाचे शिक्षक हिरामण अहिरे, शिंदे, सरपंच गावीत यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीही उपस्थित होते. प्रदीर्घ कालावधीनंतर मेळ्याला सुरुवात झाली आणि संसाराच्या रहाटगाड्यात विस्मरणात गेलेले मैत्रीचे बंध विणले गेले. काहींनी गंमतीशीर किस्से, आठवणी, विनोद सांगत या कार्यक्रमाला उंची मिळवून दिली. माजी विद्यार्थिनीच्या मुलीने स्वरचित काव्य सादर केले. कधीकाळी उमेदीच्या काळात करिअरचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी आता ज्येष्ठ नागरिक झालेले होते. त्यामुळे उपस्थित प्रत्येकाला आपली सविस्तर ओळख करून द्यावी लागली. दैवाने ज्या विद्यार्थ्यांना अर्ध्या वाटेवरून नेले, त्यांचे स्मरण करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. .

उपस्थित प्रत्येकासाठी ही भेट अत्यंत हृदयस्पर्शी ठरली. सुग्रास भोजनाने हा आनंदोत्सव गोड झाला. सर्वांच्या भेटीचा हा क्षण फोटोत बंदीस्त करत पुनर्भेटीच्या सांगाव्याने सर्वांनी साश्रुनयनांनी निरोप घेतला.