नाशिकमध्ये वाजला ‘आपलं महानगर’चा डंका!

Nasik
Aapla Mahanagar Launching

ढोल-ताशाचा गजर…राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातल्या मान्यवरांची उपस्थिती…नवं काहीतरी घडणार आहे याची पराकोटीची उत्सुकता आणि नाशिककरांचा उदंड प्रतिसाद…एखाद्या उत्सवाला शोभेल असं काहीसं वातावरण गुरुवारी नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात पाहायला मिळालं. आणि निमित्त होतं ते मुंबईत ३ दशकांच्या निर्भिड पत्रकारितेचा वारसा असलेल्या ‘आपलं महानगर’च्या नाशिक आवृत्तीच्या शुभारंभाचं! इथे कोणत्याही कार्यक्रमात दिसतात तशी मान्यवरांची उपस्थिती तर होतीच. पण त्यासोबतच ‘आपलं महानगर’ला शुभेच्छा देण्यासाठी सामान्य नाशिककरांनी मोठ्या संख्येने लावलेली हजेरी खूप काही सांगून जाणारी होती!

गणेश वंदनेनं झाली मंगलमय सुरुवात

कालिदास कलामंदिराच्या प्रांगणात सकाळपासूनच चैतन्याचं वातावरण दिसत होतं. दिमाखदार आकर्षक कमान, ठेका धरायला लावणारं ढोलपथक, गुलाब पुष्पानं केलं जाणारं पाहुण्यांचं स्वागत, मान्यवरांच्या उपस्थितीने वेगळाच उत्साह भरून राहिलेलं सभागृह अशा वातावरणात ‘आपलं महानगर’च्या प्रकाशन सोहळ्याला प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच किर्ती कलामंदिराच्या नृत्यांगणांनी गणेश वंदना सादर करत कार्यक्रमाचं संपूर्ण वातावरणच मंगलमय करून टाकलं.

…आणि नाशिककरांनी उत्स्फूर्त दाद दिली!

आता नाशिकमध्ये कार्यक्रम असताना नाशिकच्या वैभवाचं कौतुक न झालं तरच नवल! नाशिकच्या वैभवाचा आणि गौरवपूर्ण इतिहासाचा आलेख मांडणाऱ्या व्हिडिओचं यावेळी सादरीकरण करण्यात आलं. पुढे उपस्थित प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केल्यानंतर सर्वच जण ज्याची आतुरतेनं वाट पाहात होते तो क्षण आला. नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ‘आपलं महानगर’च्या पहिल्या वहिल्या अंकाचं प्रकाशन झालं आणि नाशिककरांनी टाळ्यांच्या कडकडाटात ‘आपल्या’ दैनिकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मान्यवरांच्या शुभेच्छा आणि नाशिककरांच्या अपेक्षा

नाशिकचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, मनसे नेते डॉ. प्रदीप पवार आदी मान्यवर यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या सर्वांनीच ‘आपलं महानगर’च्या नाशिकमधल्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या. महत्त्वाचं म्हणजे यावेळी जमलेल्या नाशिककरांनी देखील या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत चांगल्या बातम्या देऊन ‘आपलं महानगर’ कसोटीवर खरं उतरेल असा विश्वास देखील व्यक्त केला.