सेनेने फोडले भाजपच्या नावाने मडके

तुकडा भाजप नगरसेविकेला लागल्याने महासभेत गदारोळ; पाणीप्रश्नी सुनील गोडसे आक्रमक

Nashik
nashik
नाशिक

जयभवानी रोड परिसरातील घरांमध्ये पाण्याअभावी माठ रिकामे आहेत आणि याच विषयावर सभागृहात बोलू दिले जात नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक सुनील गोडसे यांनी सोमवारी (ता.९) महासभेच्या सभागृहात चक्क मडके फोडले. यावेळी मडक्याचा तुकडा भाजप नगरसेविका वर्षा भालेराव यांना लागल्याने सभागृहात एकाच गोंधळ उडाला. भाजप नागरसेविकांनी एकत्र येत थेट शिवसेनेचा निषेध केला. सुमारे एक तास सभागृहात गोंधळ सुरू होता. अखेर गोडसे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने प्रकरणावर पडदा पडला.

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत सुनील गोडसे हे पाणीप्रश्नावर भाष्य करणारा फलक शर्टस्वरूपात परिधान करून सभागृहात आले. त्यावर उल्लेख होता की, जयभवानी रोड परिसरातील रहिवाशांवर होणारा अन्याय बंद करा.. पाणी द्या, न्याय द्या.. दुपारी थोडं पडावं म्हणतो तर २ ते ५ या वेळेत पाणी भरण्याचे टेंशन असते. अवेळी पाणी देणं रद्द करा..’ हा फलक सभागृहात लक्षवेधी ठरत होता. महासभेत अन्य विषयांवर चर्चा सुरू असताना गोडसेंनी पाणी प्रश्नावर बोलण्याची इच्छा दर्शविली. पुढील महासभेत या विषयावर चर्चा करू अशी सूचना महापौरांनी करताच गोडसे संतप्त झाले. हातातील मडके दाखवत जयभवानी रोडवरील रहिवाशांनी रिकामे माठच बघायचे का, असा सवाल केला. मात्र तरीही महापौरांनी आपली भूमिका न बदलल्याने गोडसेंना भावना अनावर झाल्या. त्यांनी थेट पीठासनाकडे धाव घेत जमीनीवर मडके आदळले. यावेळी मडक्याचा एक तुकडा भाजपच्या नगरसेविका वर्षा भालेराव यांना डोक्याच्या मागील बाजूस लागला. त्यामुळे त्यांनी संतप्त होऊन महापौरांकडे तक्रार केली. थोड्याच वेळात भाजपच्या सर्वच महिला नगरसेविका एकत्र येत गोडसेंना तीन दिवसांसाठी बडतर्फ करा अशा मागणीच्या घोषणा करु लागल्या. यावेळी गोडसेंबरोबर शिवसेनेचाही निषेध करण्यात आला. स्थायी समिती सभापती उध्दव निमसे यांनी गोडसेंची समज काढत अशा प्रकारचे कृत्य सभागृहाच्या संहितेला छेद देणारे आहे, असे सांगत माफी मागण्याची सूचना केली. विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी भूमिका मांडताना सांगितले की, गोडसेंनी लोकशाही पध्दतीनेच आंदोलन केले. परंतु त्यांच्या हातातून मडके निसटले. त्यात भाजपच्या नगरसेविकेला ते लागेल असे त्यांनाही अपेक्षीत नव्हते. गोडसेंच्या भावना समजून घ्या. ते दिलगीरी निश्चितच व्यक्त करतील, असे बोरस्तेंनी सांगूनही नगरसेविका ऐकायला तयार नव्हत्या. अखेर बोरस्तेंनी रौद्रावतार धारण करीत हरित क्षेत्र विकासाचा प्रस्ताव विनाचर्चा मंजूर करण्यासाठी सभागृहात हा जाणीवपूर्वक गोंधळ केला जात असल्याचा संशय व्यक्त केला. गोडसेंनी दिलगीरी व्यक्त केली असती तर हा प्रश्न चिघळला नसता, असे वर्षा भालेराव यांनी सांगत विरोधीपक्षनेते या प्रश्नाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे पून्हा एकदा शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये ‘तू तू-मै मै’ झाली. अखेर गोडसे यांनी झाल्या प्रकाराची दिलगीरी व्यक्त करीत आपल्या हातून मडके निसटल्याचे सांगितले. त्यानंतर संपूर्ण प्रकरणावर पडदा पडला.

गोडसे यांच्या बडतर्फीची मागणी

भाजप नागरसेविकांनी यावेळी एकत्र येत थेट शिवसेनेचा निषेध केला. सुनील गोडसे यांच्या बडतर्फीची मागणी यावेळी नागरसेविकानी घोषणा देत केली.

कल्पना पांडे यांचे मौन

शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांच्या डोळ्याजवळ मडक्याच्या तुकडा लागला. आपल्याच नगरसेवकाच्या रौद्रवताराचा फटका त्यांना बसल्याने त्यांनी त्यावर जाहीर प्रतिक्रिया न देण्यातच धन्यता मानली.

मडके फोडले की सुटले?

माझ्या हातून मडके चुकून सुटले. त्यामुळे ते फूटून नगरसेविका भालेराव यांना त्याचा तुकडा लागला असावा असे स्पष्टीकरण सुनील गोडसे यांनी देताच सभागृहात भाजपच्या बाजूने पुन्हा गदारोळ झाला. महत्वाचे म्हणजे मडके जमिनीवर आदळून फोडण्यात आल्याचे माध्यमांच्या कॅमेर्‍यांमध्येही दिसत होते.


हे देखील वाचा – मखमलाबादला हरित क्षेत्र विकास; महासभेत‘इरादा’ झाला पक्का

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here