मेगा भरतीतून कला शिक्षक हद्दपार!

राज्यात दहा हजार शिक्षकांची ऑनलाईन भरती करण्यासाठी शिक्षण विभागाने तयार केलेल्या पवित्र पोर्टलमध्ये कला शिक्षक हे पदच काढून टाकल्याने एटीडी पात्रता धारकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

Nashik
art-teacher
प्रातिनिधीक फोटो

राज्यात दहा हजार शिक्षकांची ऑनलाईन भरती करण्यासाठी शिक्षण विभागाने तयार केलेल्या पवित्र पोर्टलमध्ये कला शिक्षक हे पदच काढून टाकल्याने एटीडी पात्रता धारकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शासकीय माध्यमिक शाळा व खासगी चित्रकला महाविद्यालयांमध्ये कला शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्‍या लाखो पदवी धारकांच्या स्वप्नांची शिक्षण विभागाने राखरांगोळी गेल्याची भावना पात्रता धारक उमेदवारांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्य कलाशिक्षक महासंघ या भरती प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणित आराखड्यात कला, संगीत, कार्यानुभव, क्रीडा विषयांना महत्वाचे स्थान देण्यात आले. परिणामी, या विषयाच्या शिक्षकांकडे विद्यार्थ्यांचे कौशल्य गुण विकसित करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली. विद्यार्थ्यांचे सुप्त कलागुण ओळखून त्यांना मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या कला शिक्षकांविषयी शिक्षण विभागात कमालीची अनास्था दिसून येते. सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलमधून हे पद काढून टाकत त्यांना हद्दपार करण्याचा हा प्रकार असल्याचे कला शिक्षक महासंघाने म्हटले आहे. मुळात माध्यमिक शाळा सेवाशर्तीमध्ये कला विषयाच्या शिक्षकांची शैक्षणिक पात्रतेनुसार भरती होणे अभिप्रेत असताना, त्यांना तासिका तत्वावर नियुक्त करण्यात आले. आता तर पोर्टलवरून हे पदच हद्दपार झाल्यामुळे कला शिक्षकांचा मानसिक छळ चालवला आहे. कला शिक्षकांच्या तासिका कमी करण्याच्या निर्णयाविरोधात महासंघाने न्यायालयीन लढा देत त्या पूर्ववत केल्या. अभ्यासक्रमात कला विषय सक्तीचा असताना पोर्टलमध्ये या शिक्षकांची पदे न भरण्याचा मार्ग हेतुपुरस्सर बंद करून तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप कला महासंघाने केला आहे. या विषयाच्या शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतल्यास संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रियेला बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे.

नवीन आदेश बेदखल

राज्य शासनाने २ फेब्रुवारी २०१९ ला नवीन आदेश जाहीर केला आहे. त्यात सर्व विषयाचा समावेश केला आहे. मात्र, एटीडी पात्रता धारक कलाशिक्षकांची पदे रद्द केल्यामुळे या पदांसाठी शिक्षक भरती प्रक्रियेत स्थान शिल्लक नसल्याचे दिसून येते.

न्यायालयात याचिका दाखल करणार

प्रत्येक माध्यमिक शाळेत एक कला शिक्षक नियुक्त करण्याविषयी धोरण असताना शासनाने कला शिक्षकांना सोयिस्कररित्या हद्दपार केले आहे. नवीन अध्यादेशात फक्त एटीडी पात्रताधारक वगळून सर्वांचा उल्लेख दिसतो. याचा नेमका अर्थ काय समजावा म्हणून आम्ही पवित्र पोर्टल व शासनाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.
– प्रल्हाद साळुंखे, अध्यक्ष , व्हिजन नाशिक कलाशिक्षक संघ.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here