आयुष्यमानच्या लाभार्थ्यांना ‘गोल्डन कार्ड’

गोरगरीब रूग्णांना वैद्यकीय उपचार घेता यावे याकरिता केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना 'गोल्डन कार्ड' देण्यात येणार आहे.

Nashik
Health_Golden_Card
आयुषमान भारत योजनेंतर्गत मिळणार आरोग्याचे गोल्डन कार्ड

मनीष कटारीया

गोरगरीब रूग्णांना वैद्यकीय उपचार घेता यावे याकरिता केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना ‘गोल्डन कार्ड’ देण्यात येणार आहे. राज्यात केवळ नाशिक आणि चंद्रपूर येथेच पथदर्शी प्रकल्प म्हणून लाभार्थ्यांना हे कार्ड देण्यात येणार आहेे. या कार्डच्या माध्यमातून लाभार्थी देशात कोठेही शासकीय रूग्णालयात उपचार घेऊ शकणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ सप्टेंबर २०१८ ला आयुष्यमान भारत योजना सुरू केली. याअंतर्गत शासकीय रूग्णालयात लाभार्थ्याला पाच लाख रूपयांपर्यंतचे वैद्यकिय उपचार घेता येणार आहेत. अर्थात या योजनेचे नेमके लाभार्थी कोण याबाबत नागरीकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. मात्र केंद्र सरकारने २०११ च्या सामाजीक, आर्थिक आणि जातीय जनगणनेनुसार राज्यातील ८३ लाख ७२ हजार कुटुंबांची या योजनेकरीता निवड केली आहे. नाशिक विभागात १७ लाख, तर नाशिक जिल्ह्यात या योजनेचे शहरी व ग्रामीण भागात ५ लाख ३ हजार ८०४ कुटुंबांतील लाभार्थी पात्र ठरले आहेत. नाशिक जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय आणि मालेगावच्या सामान्य रूग्णालयात रूग्णांना या योजनेचा लाभ घेता येईल. आता या योजनेतील लाभार्थ्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून थेट पत्र जाणार असून यापत्राद्वारे योजनेचे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातील. इतकेच नव्हे तर हे पत्र प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना नजीकच्या महा-ई सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयातून ‘गोल्डन कार्ड’ दिले जाणार आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र गोल्डन कार्ड असेल. लाभार्थ्याला या कार्डद्वारे देशातील कोणत्याही शासकीय रूग्णालयात मोफत उपचार घेता येणार आहे.

ही योजना देशभर लागू करण्यात आली असली तरी गोल्डन कार्ड केवळ नाशिक आणि चंद्रपूर जिल्हयातच देण्यात येणार आहे. या योजनेचा अभ्यास करून नंतर ती संपूर्ण देशात लागू करण्यात येईल. केंद्राकडून नाशिक जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मोदींचे हे पत्र पाठविण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी कुटुंबांना आता यादीत नाव शोधण्याची आवश्यकता भासणार नाही. हे पत्र प्राप्त होईल ते कुटुंब या योजनेस पात्र असल्याचे आयुष्यमान योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ.नितीन पाटील यांनी सांगितले.

काय आहे गोल्डन कार्ड

एटीएम सारख्या असलेल्या या कार्डावर संबधित लाभार्थ्याचे नाव, फोटो असेल. तसेच यावर आधार क्रमांक, बारकोड नंबर आदी माहिती असेल. ही माहिती संगणकावर अपलोड करून लाभार्थ्याच्या बोटाचे ठसे घेतले जातील. ही माहिती संकलित केली जाईल. यानंतर हे कार्ड रूग्णालयात दाखवल्यास संगणकावर त्याची सर्व माहिती उपलब्ध होऊन उपचार सुरू करता येणार आहे.

लवकरच खासगी रूग्णालयात सेवा

सध्या राज्यात नाशिक आणि चंद्रपूर जिल्ह्यात गोल्डन कार्ड वाटप करण्यात येणार आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र कार्ड असणार आहे. २०११ च्या सर्वेक्षणानूसार या योजनेचे लाभार्थी निश्चित करण्यात आले आहे. सध्या ही योजना केवळ शासकीय रूग्णालयातच उपलब्ध असून लवकरच महात्मा फुले आरोग्य योजनेप्रमाणे खासगी रूग्णालयातही लागू केली जाणार आहे. – डॉ. नितीन पाटील, विभागीय व्यवस्थापक आयुष्यमान भारत

असे शोधा नाव

या योजनेत आपले नाव आहे की नाही हे शोधण्यासाठी टोल फ्रि क्रमांक १४५५५ किंवा १८००१११५६५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

असे आहेत लाभार्थी

  • राज्यात एकूण लाभार्थी – ८३ लाख ७२ हजार
  • नाशिक विभागात एकूण लाभार्थी – १७ लाख
  • नाशिक जिल्ह्यातील लाभार्थी – ५ लाख ३ हजार ८०४
  • ग्रामीण भागातील लाभार्थी – ३ लाख ४१ हजार ७२७
  • शहरी भागातील लाभार्थी – १ लाख ६२ हजार ८८