हरिहर किल्ल्यावर पर्यटकांना तीन महिने बंदी

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत वनविभागाने घेतला निर्णय

Nashik
harihar fort
प्रातिनिधिक फोटो

हरिहर गडावर गिर्यारोहक आणि प्रवाश्यांची गर्दी असते मात्र काही हुल्लडबाजी करणारया पर्यटकांमुळे इतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो त्यातच पावसाळयात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जिल्हाधिकारयांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानूसार दिलेल्या निर्देशाचा आधार घेत हरिहर गड पावसाळ्यातील तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. हरिहरगड येथे हुल्लडबाजी करणार्‍यांचे प्रमाण अधिक असल्याची तक्रारी होत्या.नाशिक पश्चिम वनविभागातर्फे हरिहरगडाच्या पायथ्याशी ’प्रवेश निषिद्ध’ असे फलक लावण्यात आले आहे. गेल्या आठवडयात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्यावर पर्यटकांच्या गर्दीने मोठी कोंडी झाली होती. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. यानंतर पश्चिम वनक्षेत्राचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी किल्ल्याच्या परिसराची पाहणी करण्याचे आदेश परिक्षेत्र अधिकार्‍यांना दिले. यानुसार परिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांनी राखीव वन क्षेत्रात येणार्‍या किल्ल्याच्या परिसराची पाहणी केली. पाहणीअंती पर्यटकांना विनापरवानगी गडावर जाता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्र्यंबकेश्वर वैतरणा मार्गे घोटी इगतपुरी मार्गावर टाके हर्ष किंवा त्याचा पुढचा निरगुड पाडा येथुन हरिहर किल्ला लांबुनच पर्यटक गिर्यारोहकांचे लक्ष वेधुन घेतो. मात्र या किल्ल्याच्या पाय-या अत्यंत अरुंद असुन एका वेळेस एकच माणूस चढेल व उतरेल अशा हिशेबाने बांधण्यात आल्या आहेत. मागच्या रविवारी गडावर पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली असती मात्र सुदैवाने ही घटना टळली. याची दखल घेत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा परिषद, तहसिलदार, ग्रामपंचायत, नगरपरिषद आदींनी गर्दी, अफवा पसरविणे, चेंगराचेंगरी, आपत्ती विषयक भितीचे वातावरण निर्माण करणे यासाठी स्थानिक प्राधिकरणाने उपाय योजना करावी असे निर्देश जिल्हाधिकारयांनी दिले होते. तसेच पर्यटन स्थळांवर स्थानिक प्राधिकरणाच्या परवानगीनंतर जावे असे आदेशही जिल्हाधिकारयांनी दिले होते या निर्णयाच्या आधारे पर्यटकांना हरिहर गडावर बंदी घालण्यात आली आहे.