घरमहाराष्ट्रनाशिकनिवडणूक निकालानंतर शहरात मिरवणुकीस बंदी

निवडणूक निकालानंतर शहरात मिरवणुकीस बंदी

Subscribe

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील

लोकसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी (ता.२३ मे) जाहीर होणार आहेत. या दिवशी कोणताही गैरप्रकार होणार नाही, यासाठी नाशिक शहर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभेचे वेयर हाऊस अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. वेअर हाऊसला कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी निवडणूक निकालानंतर शहरात मिरवणुका काढण्यास बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नांगरे-पाटील म्हणाले, जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य वेअर हाऊसमध्ये ठेवलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त असल्याने सर्वांना २३ मे रोजी होणार्‍या मतमोजणीची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. वेअर हाऊस २३ मे रोजी त्रिस्तरीय बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यामध्ये पॅरामिलिटरी फोर्स, एसआरपीएफ व स्थानिक पोलीस कार्यरत राहणार आहे. सर्व यंत्रणा सीसीटीव्हीसह कंट्रोल रूमपर्यंत सुसज्ज आहेत. ३०० होमगार्डचा अतिरिक्त बंदोबस्त असणार आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी ४ पोलीस उपायुक्त, ६ सहायक पोलीस उपायुक्त, १६ पोलीस निरीक्षक, ९५ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ७५३ पोलीस कर्मचारी, २११ महिला कर्मचारी, ३०० होमगार्ड, ५ स्ट्रायकिंग फोर्सेस, २ एसआरपीएफची तुकडी कार्यरत राहणार आहे. शहरातील ४८ संवेदनशील मतदान केंद्रांच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला जाणार आहे. तसेच लोकसभा उमेदवारांच्या घरे व पक्षीय कार्यालय यांना बंदोबस्त ठेवला जाणार आहे. यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले, अशोक भगत, पोलीस निरीक्षक संजय सांगळे, मंगलसिंग सूर्यवंशी, सोमनाथ तांबे, आर. आर. पाटील, विजय ढमाळ उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -