नेदरलँडच्या बँकेचे ‘सह्याद्री’ला अर्थसहाय्य

५० कोटींच्या कर्जरकमेतून देशभर स्टोअर्स उभारणार

Nashik
IMG_20190409_195412

नाशिक जिल्ह्यातील जवळपास १४ हजार शेतकर्‍यांना जोडणार्‍या सह्याद्री फार्म या शेतकरी उत्पादक कंपनीचे विपणन (मार्केटिंग) जाळे विस्तारण्यासाठी नेदरलँडमधील एफएमओ या खासगी बँकेने ७५ लक्ष युरो म्हणजे ५० कोटींचे कर्ज देऊ केले आहे. शेतकर्‍यांना उत्पादनाबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच उत्पादित शेतमालाची विक्री व प्रक्रिया, निर्यात करणारी सह्याद्री फार्म आगामी काळात देशभरातील प्रमुख शहरांमध्ये स्टोअर्स सुरू करणार आहे. त्यासाठी या कर्ज रकमेचा वापर होणार आहे.

सह्याद्री फार्म ही दिंडोरी, निफाड, सिन्नर तालुक्यातील शेतकर्‍यांची उत्पादक कंपनी असून ती द्राक्ष निर्यात करणारी देशातील प्रथम क्रमांकाची कंपनी आहे. या कंपनीतर्फे शेतकर्‍यांना पीक पद्धती निश्चित करणे, खते, बियाणे पुरवणे, तांत्रिक मार्गदर्शन करणे तसेच विक्री, प्रक्रिया, निर्यात आदींंबाबत शेतकर्‍यांना मदत करते. कंपनीतर्फे जवळपास सर्वच फळे व भाजीपाल्यावर प्रक्रिया केली जाते. याशिवाय ग्राहकांना नो युवर फुड (आपले अन्न ओळखा) या योजनेतून ग्राहकांना विषमुक्त अन्न पुरवण्याची विपणण व्यवस्था कंपनीतर्फे उभारली जात आहे. यासाठी कंपनीला मोठ्या भांडवलाची गरज आहे. या विपणण व्यवस्थेतून भारतातील प्रमुख शहरांमध्ये कंपनीचे स्टोअर्स सुरू केले जाणार आहेत.


हे देखील वाचा – कॅलिफोर्नियातील आरा द्राक्षाचे वाण रुजणार नाशिकच्या मातीत


या प्रकल्पासाठी नेदरलँडच्या एफएमओ या बँकेने ७५ लाख युरो कर्ज देण्याची तयारी केली आहे. हे कर्ज दीर्घमुदतीचे असून त्यातून कंपनी स्वताची विपणन साखळी उभी करणार आहे. या आधीही कंपनीने नाशिक, मुंबई येथे आउटलेट सुरू केले असून त्याला ग्राहकांना प्रतिसाद मिळत असल्याने त्याचा विस्तार करण्यात येत असल्याचे कंपनीतर्फे सांगितले जात आहे.

आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट

एक परदेशी बँक सह्याद्री फार्म या शेतकर्‍यांच्या कंपनीला कर्ज देते ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कर्ज मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या रकमेतून भारतभर कंपनीचे स्टोअर्स उभारले जाणार आहेत. फळे, भाजीपाला व प्रक्रिया उत्पादनांना या माध्यमातून शाश्वत बाजारपेठ उपलब्ध केली जाणार आहे. – विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी.