घरमहाराष्ट्रनाशिकपवारांच्या दौर्‍यात भुजबळ अनुपस्थित

पवारांच्या दौर्‍यात भुजबळ अनुपस्थित

Subscribe

शहरात स्वागताला थंड प्रतिसाद; निम्म्याहून अधिक पदाधिकारी अनुपस्थित

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडझड झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षाला नवी उभारी देण्यासाठी राज्य दौर्‍यावर निघालेले पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे सोमवारी (दि.१६)नाशिकमध्ये थंडपणाने स्वागत झाले. पक्षाचे ज्येष्ठनेते छगन भुजबळांसह राष्ट्रवादीच्या निम्म्याहून अधिक पदाधिकार्‍यांनी त्यांच्या स्वागताकडे पाठ फिरवली. माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांचे स्वागत केले, त्यावेळी केवळ १०० च्या आत कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदार, माजी मंत्री यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजप वा शिवसेनेचा रस्ता धरला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य दौर्‍याचे नियोजन करून प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार ते आज नाशिक येथे आले. नेते पक्ष सोडून जात असले, तरी कार्यकर्ते पक्षासोबतच असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पवारांच्या स्वागताला गर्दी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, नाशिक येथील राष्ट्रवादी भवन येथे पवार पोहोचले तेव्हा केवळ १०० कार्यकर्ते उपस्थित होते. माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांचे स्वागत केले. पक्षाचे जिल्ह्यात चार आमदार, १८ जिल्हा परिषद सदस्य, नाशिक महापालिकेत ६ नगरसेवक याशिवाय पंचायत समिती सदस्य, नगर पालिकांमध्ये अनेक नगरसेवक, नाशिक, चांदवड, येथे पंचायत समिती सभापती असतानाही त्यातील अनेकांनी पवारांच्या स्वागताकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या आधीच पक्षाला महागळती लागल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही मरगळ आली असून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी वयाच्या ७८व्या वर्षातही राज्य दौरा काढण्यासाठी निघालेल्या पवारांच्या प्रयत्नांचे कौतुक होत असले, तरी कार्यकर्त्यांना आता फारशा आशा उरल्या नसल्याचे यातून दिसून आल्याचे बोलले जात आहे.

भुजबळ बैठकीसाठी मुंबईत

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची सोमवारी (दि.१६) मुंबईत आघाडीच्या जागा वाटपासाठी बैठक होत आहे. या बैठकीसाठी ज्येष्ठनेते छगन भुजबळ मुंबईत असल्याने ते स्वागतासाठी उपस्थित राहू शकले नाही, असा खुलासा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. मात्र, पक्षाची सध्याची अवस्था पाहता पवार यांचे जोरदार स्वागत करून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शक्तीप्रदर्शन केले जाईल, असा अंदाज होता. मात्र, तो फोल ठरला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -