रेशन दुकानांत रेंज अभावी बायोमेट्रिक ठप्प

रेशन दुकानांत धान्य मिळत नसल्याने लाभार्थ्यांची नाराजी

Nashik
bio metric
प्रातिनिधिक फोटो

स्वस्त धान्य वितरण योजनेतील बायोमेट्रिक प्रणाली बुधवारपासून ठप्प झाल्यामुळे शेकडो रेशनकार्डधारकांना हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. विशेष करून ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती असताना गरीब आणि विशेषत: दुष्काळग्रस्त जनतेच्या पोटापाण्याचा मुख्य आधार असणार्‍या स्वस्त धान्य दुकानांमधून गेल्या काही दिवसांपासून रेशन विक्रीच ठप्प झाली आहे. सर्व्हर डाऊनमुळे इ-पॉस मशीन्स बंद झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.

नाशिक शहरात २२९ स्वस्त धान्य दुकाने असून, शहरात सुमारे एक लाख १२ हजार ८२६, तर जिल्ह्यात ६ लाख शिधापत्रिकाधारक आहेत. रेशनबाबतचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी या दुकानांमधून आधार कार्ड व बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्यवाटप केले जाते. दारिद्य्ररेषेखालील नागरिकांना रेशनवर फक्त गहू, तांदूळ मिळतात.गेल्या दोन दिवसांपासून रेशनवर गहू, तांदूळ, डाळ मिळालेली नाही. इ-पॉस मशीनवर अंगठा लावल्यानंतर ग्राहकांना रेशनवर धान्य मिळाल्याने गैरप्रकारांना थोडा आळा बसला आहे. सरकारच्या या निर्णयाचे रेशन दुकानदार व त्यांच्या संघटनांनीही स्वागत केले आहे; परंतु या मशीनमधील तांत्रिक दोष काढण्यात पूर्णत: यश न आल्याने सर्व्हर डाऊन झाल्यावर ही मशीन बंद पडण्याचे प्रकार अधूनमधून सर्रास घडत आहेत. यावेळी सलग दोन दिवस हा तांत्रिक बिघाड कायम राहिला असून त्याला कोणी वालीच नसल्यासारखी परिस्थिती आहे. जिल्ह्यात ओएस कंपन्यांकडून इ-पॉस मशीन घेऊन ती दुकानदारांना दिली आहेत. यासाठी जिल्हा किंवा तालुकास्तरावर तंत्रज्ञाची नियुक्ती करणे आवश्यक आहे; परंतु ती केलेली नाही. तसेच तांत्रिक माहिती देण्याकरता प्रशासकीय अधिकारीही नेमलेला नाही.

हा प्रश्न मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल

सर्व्हर डाऊनमुळे राज्यभरातील इ-पॉस मशीन बंद असून, रेशनवरील धान्य विक्री पूर्णपणे बंद आहे. राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप न करता बघ्याची भूमिका घेत आहे. हा प्रश्न मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन केले जाईल. -निवृत्ती कापसे, जिल्हाध्यक्ष रेशन दुकान संघटना.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here