घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये भाजपचा काठावर बचाव; गिरीश महाजन ठरले तारणहार!

नाशिकमध्ये भाजपचा काठावर बचाव; गिरीश महाजन ठरले तारणहार!

Subscribe

नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाचे सुमारे १३ नगरसेवक फोडण्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेला नाशिकचे माजी पालकमंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांनी तोंडघशी पाडले आहे. महापालिकेत सत्ता स्थापन होईल, इतके संख्याबळ भाजपला पुन्हा मिळवून देण्यात महाजन यशस्वी झाले आहेत. यासाठी त्यांना मनसेची मोठी मदत मिळाल्याची जोरदार चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. गिरीश महाजनांच्या या ट्रबलशूटिंगमुळे आता नाशिकच्या महापौरपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांची बिनधोक नियुक्ती झाली असून उपमहापौरपदासाठी ८२ वर्षांच्या भिकुबाई बागूल यांना संधी मिळणार आहे.

भाजपचे ‘ते’ १३ नगरसेवक वळवले!

नाशिकमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज झाली. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणारे बाळासाहेब सानप यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आणि नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा निर्धार त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी त्यांचे समर्थक असलेले १३ भाजप नगरसेवक सोबत घेतले होते. इतकेच नाही तर भाजपचे नगरसेवक कमलेश बोडके यांना शिवसेनेने पाठिंबा देत त्यांच्याकडून महापौर आणि उपमहापौर पदाचा अर्ज देखील भरून घेतला होता. त्यामुळे महापालिकेत आता शिवसेनेचीच सत्ता स्थापन होईल, असं चित्र निर्माण झालं होतं.

- Advertisement -

…आणि भाजपचा जीव भांड्यात पडला!

शुक्रवारी सकाळपर्यंत शिवसेनेचे संख्याबळ हे भारतीय जनता पक्षापेक्षा अधिक होतं. मात्र, गिरीश महाजन यांनी सकाळी इगतपुरी येथील माणूस हॉटेलमध्ये ठिय्या मांडून तिथून सूत्र फिरवली आणि हे सर्व नगरसेवक पुन्हा भाजपच्या गोटात दाखल करून घेतले. त्यात प्रमुख्याने त्यांनी सानप समर्थक नगरसेवकांना कवेत घेण्यासाठी चर्चा केली. मोठ्या चर्चेअंती या नगरसेवकांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या पाठिशी असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांशी देखील चर्चा करून त्यांना तटस्थ राहण्याची विनंती केली. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ आपसूकपणे कमी झालं. त्यामुळे अखेर भाजपचे सतीश कुलकर्णी यांची नाशिकच्या महापौरपदी निवड झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -