वाचा… महाजनादेश यात्रेच्या समारोपात काय म्हणाले नेते

गिरीश महाजनांचा विश्वास, चंद्र्कांत पाटलांचा निर्धार, पंकजा मुंडेंची टीका, सुभाष भामरेंचा अभ्यास आणि आठवलेंच्या अपूर्ण राहिलेल्या चारोळ्या

Nashik

नाशिकमध्ये झालेल्या महाजनादेश यात्रेच्या समारोप पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंत्र्यांची मांदियाळी मंचावर उपस्थित होती. यापैकी काही मंत्र्यांनी पंतप्रधानांचे आगमन होईस्तोवर भाषण केले.

पालकमंत्री गिरीश महाजन

लोकसभा निवडणूकीत उत्तर महाराष्ट्रातून आठ खासदार पाठविण्याचा निर्धार यशस्वी केल्यानंतर आता 47 पैकी 45 आमदार विधानसभेत पोहोचतील, असा दावा राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथे केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेला प्रत्येक शब्द आम्ही खरा करुन दाखवला आहे. विधानसभा निवडणूक जिंकण्याची ग्वाही त्यांना देत असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगीतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.19) नाशिकमधील तपोवन, पंचवटी येथे भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप झाला. राज्यात तीन टप्प्यात पार पडलेल्या या यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे महाजन यांनी सांगीतले. सव्वाचार हजार किलो मिटरची महाजनादेश यात्रेचा नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात समारोप झाला. यात्रेचा समारोप झाला तरी विचारयात्रा सुरु झाल्याचे सांगत त्यांनी विधानसभा निवडणूकीचे संकेत दिले. येत्या विधानसभेत राज्यात काय स्थिती राहील, हे सांगण्यासाठी भविष्यवेत्त्याची गरज राहिलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने लोकसभेत भाजपने केलेली दमदार कामगिरी विधानसभा निवडणूकीत कायम राहील, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक व नगर येथील 47 जागांपैकी एक किंवा दोन जागा इकडे, तिकडे होतील, असे भाकित वर्तवत 45 आमदार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

फडणवीस साडेअकरा वर्ष मुख्यमंत्री: चंद्रकांत पाटील

नाशिक : महाराष्ट्राने आजवरच्या कार्यकाळात स्व.वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच संपूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केला. तसेच साडेअकरा वर्ष मुख्यमंत्री राहण्याचा रेकॉर्ड फडणवीस ब्रेक करतील, असा विश्वास राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले, फडणवीस हे अत्यंत संवेदनशील व दुरदृष्टी राखणारे नेते आहेत. पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी एकही दिवस सुटी न घेता अहोरात्र काम केले. त्यामुळे राज्यात अनेक प्रलंबित विषय मार्गी लागले. यात प्रामुख्याने मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाची प्रक्रिया सुरु केली. शाहु महाराजांनी 1902 साली मराठा समाजाला दिलेले आरक्षण 1947 मध्ये कोठे गायब झाले, कळालेच नाही. तेव्हापासून प्रलंबित आरक्षणाचा हा मुद्दा निकाली काढत मुख्यमंत्र्यांनी कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण दिले. मराठा समाजासाठी सारथी, ओबीसी व भटक्या जमातींसाठी महाज्योती व आरक्षण विरहीत समाज घटकांसाठी अमृत योजना नव्यानेच सुरु केल्याचे पाटील म्हणाले. गेल्या पाच वर्षात राज्यात एकही दंगल झाली नाही. आशा, गटप्रवर्तकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी गाडीत बसून घेतला. राज्यातील या कर्मचार्‍यांना 140 कोटी रुपये मानधन स्वरुपात दिले जाणार आहेत. त्यामुळे धडाडीचे निर्णय घेण्यासाठी मजबूत सरकार स्थापन व्हायला हवे. विधानसभा निवडणूकीत 220 की 250 जागा जिंकणार हीच औपचारिकता आता शिल्लक असल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्रात पुन्हा भाजप सत्तेत येणार असल्याचे ग्वाही दिली.

बीडमध्ये पवार स्वत: उभे राहीले तरी पडतील: पंकजा मुंडे

नाशिक : ‘आडवा आणि जिरवा’ या आडवणूकीच्या धोरणांवर आधारित राजकारण करणार्‍या राष्ट्रवादीने बीड जिल्ह्यातून विधानसभेची तयारी सुरु केली आहे. पण, तुम्ही स्वत: जरी येथे येवून उभे राहिलात तरी, आता ’कमळा’शिवाय पर्याय राहिलेला नाही, असे सांगत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला. काँग्रेस मुक्त महाराष्ट्र तर झालाच आहे, आता ‘राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र’ हेच आमचे मिशन राहणार असल्याचा टोलाही त्यांनी येथे लगावला. चार पिढ्या गेल्या ज्यांना गांधी घराण्याशिवाय देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असा विश्वास वाटला नाही. पंतप्रधान मोदी यांनी हा विश्वास निर्माण केला. इतकेच नव्हे तर एका सर्वसामान्य घरातील व्यक्ती सर्वोच्च पदावर पोहोचू शकते, असा आत्मविश्वास भाजपने निर्माण केल्याचे त्यांनी सांगीतले. धर्मावर आधारित राजकारण करत असल्याचा आरोप विरोधक आमच्यावर करतात. पण, काँग्रेस, राष्ट्रवादीने जाती, धर्मांमध्ये तेढ निर्माण करुन अनेक वर्ष सत्ता उपभोगली. देशातील जनता आता हुशार झाली असून त्यांना निडर व पारदर्शी कारभार करणारे सरकार हवे आहे. याठिकाणी आज स्व.गोपीनाथ मुंडे यांची आठवण होते. वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सर्व जाती, धर्मांची वज्रमुठ बांधली. मराठवाडा सारख्या कायम दुष्काळग्रस्त भागात पाऊस कमी पडलेला असला तरी निधी आम्ही कमी पडू दिलेला नाही. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक गावे दुष्काळमुक्त केली आहेत. यापुढेही या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करत मुंडे यांनी महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्याचा निश्चय बोलून दाखवला.

पवारांना 47 वर्ष छत्रपतींचे वारस दिसले नाही: सुधीर मुनगंटीवार

नाशिक : छत्रपती शिवरायांच्या नावाने राजकारण करणार्‍या राष्ट्रवादीला गेल्या 47 वर्षात छत्रपतींचा परिवार कधी दिसला नाही. केवळ स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिल्यामुळे ‘बारामती म्हणजे महाराष्ट्र!’ असे समीकरण शरद पवार यांनी तयार केल्याचा टोला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे लगावला. महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी ते नाशिकमध्ये बोलत होते.
महाराष्ट्राला भ्रष्टाचाराने कंलकीत करण्याचे काम काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले. सर्वाधिक जाड जमडी कोणत्या प्राण्याची असते? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला. यावर गेंडा असे उत्तर मिळताच ते पुढे म्हणाले, 47 वर्ष या कातडीचे सरकार काम करत होते. स्वार्थापोटी आंधळे झालेले काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते मस्तवाल झाले आहेत. या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी 2014 मध्ये जनतेनी त्यांना पराभूत करुन भाजप, महायुतीचे सरकार स्थापन करुन विकासाची मुहुर्तमेढ रोवली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. त्यासाठी दुरदृष्टी व पारदर्शक कारभार करणार्‍या भाजप सरकारला पुन्हा निवडून देण्याचा संकल्प या कुंभनगरीत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

2014 पूर्वी भ्रष्टाचार बोकाळला: सुभाष भामरे

नाशिक : भारत माता की जय, वंदे मातरमऽऽऽ अशा घोषणा देत माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार सुभाष भामरे यांनी भाषणाला सुरुवात केली. मात्र, जनसमुदाय त्यांना अपेक्षित प्रतिसाद देत नसल्याचे बघून त्यांनी पुन्हा घोषणा दिला. इतक्या मोठ्या आवाजात घोषणा द्या की विरोधकांच्या छातीत धडधड व्हायला हवी, असे सांगत त्यांनी 2014 पूर्वी देशात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला होता, असा घणाघाती आरोप काँग्रेस, राष्ट्रवादीवर केला. देशाचे भले करण्याची शाश्वती वाटणार्‍या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप पूर्ण बहुमतात निवडूण आले. पंतप्रधान नव्हे तर प्रधानसेवक असल्याची ग्वाही मोदी यांनी दिली, म्हणून भाजप सरकार गरीबांना समर्पित आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते की, दिल्लीतून शंभर रुपये पाठवले तर गल्लीपर्यंत फक्त दहा रुपये पोहोचतात. पण भाजप सरकारने थेट बँक खात्यावर पैसे वर्ग करण्याची (डीबीटी) योजना आणल्यामुळे देशाचे 90 हजार कोटी रुपये वाचवले. कलम 370, तीन तलाक विधेयक मंजूर करुन भाजपने सर्वव्यापी निर्णय घेतल्याचे भामरे यांनी यावेळी सांगीतले. 70 वर्षांपासून प्रलंबित कलम 370 रद्द करुन भारत एकसंध केल्याची भावना याप्रसंगी दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ.भारती पवार यांनीही व्यक्त केली.

अर्ध्यावरच राहीली आठवलेंची कविता

आपल्या खुमासदार शैलित शिघ्र कविता सादर करणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नेहमीप्रमाणे कवितांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मोदींची वाट बघून कंटाळलेल्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच ठरणार होती. मात्र, केवळ सहा कविता सादर झाल्या आणि मोदींचे व्यासपीठावर आगमन झाले. त्यामुळे अर्ध्यावर कविता सोडून देत त्यांना भाषण आटोपते घ्यावे लागले. त्यांनी सादर केलेल्या कविता…
-तोडून काँग्रेस व राष्ट्रवादीचे बंधन…करतो मी छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेबांना वंदन…
-देवेंद्र फडणवीस घेवून आले आहेत विकासाचे नंदन…नरेंद्र मोदी करणार आहेत आपल्या विरोधकांचे मुंडन…
-देवेंद्र फडणवीस यांनी पुर्ण केली आहे महाजनादेश यात्रा… म्हणून या महाराष्ट्रामध्ये चालणार आहे नरेंद्र मोदी यांची मात्रा
-आम्ही घाबरत नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मात्रा…कारण देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी केली आहे महाजनादेश यात्रा….
-नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आ रहे है महाराष्ट्र को न्याय देणे के लिये…और मै जा रहा हू कुछ दिनो का बदला लेने के लिये…