शिवसेनेला आम्ही बाहेरचा रस्ता दाखवलेला नाही : अमित शहा

खासगी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्ती केली प्रतिक्रिया

Amit shaha
अमित शहा यांचे स्पष्टीकरण

शिवसेना असो की अकाली दल, आम्ही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलेला नाही. हे दोन्ही पक्ष स्वत:हून एनडीएमधून बाहेर पडले. त्याला आम्ही काय करणार, असा सवाल करत ‘शिवसेनेसोबत पुन्हा युती करणार का’, हे आज सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लगावला.

नेटवर्क १८ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांना शिवसेनेसोबत पुन्हा युती करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना शहा म्हणाले की, पुन्हा युती करणार की नाही, हे आज सांगायला मी काही ज्योतिषी नाही. तसेच शिवसेना आणि अकाली दल हे दोन्ही पक्ष पूर्वी एनडीएचे घटक पक्ष होते. ते स्वत:हून एनडीएमधून बाहेर पडले आहेत. आम्ही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलेला नाही. त्यामुळे आम्ही काय करू शकतो.

मागील वर्षी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक एकत्र लढलेली शिवसेना आणि भाजप यांची युती निवडणुकीच्या निकालानंतर संपुष्टात आली. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, या आग्रहासाठी शिवसेनेने भाजपशी साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करत राज्यातील सत्ता आणि मुख्यमंत्रीपदही मिळवले. त्यानंतर शिवसेना केंद्र सरकारमधून बाहेर पडली. शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या अवजड उद्योग मंत्रीपदाचा राजीनामा दिला. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर केंद्र सरकारला त्यांच्या खासदारांनी अनेकवेळा घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच मुखपत्र सामनातून केंद्र सरकारवर वारंवार टीका करत, शिवसेनेने एनडीए प्रवेशाचे आपले सर्व दरवाजे बंद करून टाकले. तर कृषी विधेयकाला विरोध करत अकाली दलानेही भाजपची साथ सोडली. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी एनडीएतून बाहेर पडलेल्या या दोन कधी काळच्या भाजपच्या मित्र पक्षांवरच दोषारोप केला आहे.