घरमहाराष्ट्रनाशिकनेत्रहीन सागरची ‘डोळस’ कामगिरी; सलग पाचव्यांदा केले कळसुबाई शिखर सर

नेत्रहीन सागरची ‘डोळस’ कामगिरी; सलग पाचव्यांदा केले कळसुबाई शिखर सर

Subscribe

राज्यातील सर्वाधिक उंच कळसुबाई शिखर २१ वेळा सर करत जागतिक विक्रम करण्याचा संकल्प नेत्रहीन दुर्गसंवर्धक सागर बोडके यांनी केला आहे. नुकतेच त्यांनी सलग पाचव्यांदा हे शिखर यशस्विरित्या सर केले.

सुशांत किर्वे

राज्यातील सर्वाधिक उंच कळसुबाई शिखर २१ वेळा सर करत जागतिक विक्रम करण्याचा संकल्प नेत्रहीन दुर्गसंवर्धक सागर बोडके यांनी केला आहे. नुकतेच त्यांनी सलग पाचव्यांदा हे शिखर यशस्विरित्या सर केले. त्यांच्यासमवेत सुख समृद्धी बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य होते. याप्रसंगी स्थानिकांनी या सदस्यांना उंचच उंच डोंगररांगा, खोल दर्‍या, घनदाट जंगल, सह्याद्रीची पर्वतरांग, विविध वनस्पती, किटक, किल्ल्यांचा इतिहास याबाबत परिपूर्ण माहिती दिली. यानंतर सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत शिखरावर भगवा फडकावला.

- Advertisement -

नाशिकमधील सुख समृद्धी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने साहसवीर सागरच्या नेतृत्वाखाली कळसूबाई शिखराची मोहीम आयोजित केली. नाशिक शहरातील तरुणांनी मोहिमेत सहभाग घेतला. सर्वजण पहाटे ५.३० वाजता पेठसेट येथे तरुणांची टीम जमली. सकाळी १० वाजेच्या सुमारास परिसरातील रहिवाशी काशीनाथ घोले यांच्या मार्गदर्शनाखाली पाऊलवाटेने शिखर चढण्यास सुरूवात केली. कळसूबाई शिखर हे अकोले तालुक्यात १ हजार ६४६ मीटर उंचीवर आहे. शिखरावर कळसूबाई देवीचे छोटे मंदिर आहे. सागरने यापूर्वी चार वेळा कळसूबाई शिखर सर केल्याचे सांगितले. अनेक जण पहिल्यांदाच अशा प्रकारच्या मोहिमेत सहभागी झाले होते. चार वेळा कळसुबाई शिखर सर केलेल्या सागरच्या नेतृत्वाखाली कळसूबाई शिखर सर करताना प्रत्येकाच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. ‘जय भवानी, जय शिवाजी..’, ‘कळसू माता की जय..’च्या घोषणा देत तरुणांचा हा जथ्था शिखरावर पोहोचला. कळसूबाईच्या मंदिरात दर्शन घेऊन सर्वांनी भगवा ध्वज महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर फडकाविला. तिथे साहसवीर सागरने गिर्यारोहणाचे अनुभव सांगितले.

सागरचे आजवरचे खडतर अनुभव ऐकून सर्वांचा थकवा निघून गेला. सर्वजण रात्री ८ वाजता शिखराच्या पायथ्याशी परतले. वाटेत लागणार्‍या पाण्याच्या झर्‍यांचे पाणी पित सर्वांनी आपली तृष्णा भागवली. तसेच वाटेत वृक्षसंवर्धनाबाबत स्थानिकांशी संवाद साधला. विविध भागांतून जमलेल्या तरुणांनी एकमेकांशी संवाद साधून ट्रेकिंगचे अनुभव कथन केले. यावेळी सुख समृद्धी संस्थेचे सदस्य डॉ. संतोष वैद्य, डॉ. हनुमंत ठोके, रमेश कुलकर्णी, अनिकेत गाढवे, राहुल पाटील, ओमकार वैद्य, श्रावणी वैद्य, अपेक्षा ठोके, सारिका सागर, गौरी वैद्य आदी उपस्थित होते.

- Advertisement -

शिखरावर साफसफाई

राज्यातील सर्वाधिक उंचीचे आणि थंड हवेचे ठिकाण असल्याने अनेक पर्यटक, गिर्यारोहक कळसूबाई शिखरावर येत असतात. परंतु, काही पर्यटक पर्यावरणाला मारक ठरतील अशा प्लास्टिकच्या चीजवस्तू येथेच सोडून जातात. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. याची जाणीव ठेवून धार्मिक भावना जोपासतानाच पर्यावरणाचा संदेश देत सर्वांनी शिखर परिसरात साफसफाई केली. तसेच पर्यटकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीही केली. – डॉ. संतोष वैद्य, सुख समृद्धी केअर सेंटर, वृद्धाश्रम, पंचवटी

संकल्पपूर्तीकडे वाटचाल

कळसूबाई शिखर २१ वेळा सर करून जागतिक विक्रमाचा मानस आहे. त्याचबरोबर वृक्ष संवर्धन अन् स्वच्छतेबाबत पर्यटकांत जनजागृतीचा संकल्प आहे. सलग पाचव्यांदा यशस्वीरित्या शिखर सर केल्याचा मनापासून आनंद होतोय. – सागर बोडके

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -