नाशिकमध्ये डिझेल टाकून प्रेयसीला पेटवले

प्रियकराला अटक; महिलेची प्रकृती चिंताजनक

Nashik
crime_scene
(फोटो प्रातिनिधीक आहे.)

आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुशिंगे मळा येथे भाडेतत्त्वावर एका खोलीत राहणार्‍या महिलेच्या अंगावर प्रियकराने डिझेल टाकून जिवंत पेटवून देण्याचा प्रकार घडला. रविवारी (दि. ८) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात महिला ९० टक्के भाजली आहे. आडगाव पोलीस ठाण्यामध्ये प्रियकरावर जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला असून, संशयित प्रियकराला आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


हे देखील वाचा – नाल्यात बुडून चिमुकलीचा मृत्यू


आडगाव शिवारातील कोणार्कनगर येथे राहणार्‍या प्रवीण कृष्णा डोईफोडे (वय ३४) याचे दुशिंगे मळ्यात राहणार्‍या एका ३२ वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या महिलेचा विवाह २००० ला नगर जिल्ह्यातील पाटोदा येथील व्यक्तीशी झाला होता. दुर्दैवाने त्याचे गेल्या दिड वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून ही महिला आडगाव मेडिकल कॉलेजच्या मागे दुशिंगे मळ्यात भाडेतत्त्वावर राहत होती. ती कॅन्टीनमध्ये काम करीत होती. तिच्यासोबतच आचारीचे काम करणार्‍या प्रवीण डोईफोडे याच्याबरोबर प्रेमसंबंध होते. रविवारी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्याने तिच्या अंगावर डिझेल टाकून पेटवले. यात ती ९० टक्के भाजली. उपचारासाठी आडगाव मेडिकल कॉलेजच्या हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार आणि त्या महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रवीण डोईफोडे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.