लाचखोर महिला सरपंच, पोलिसासह एकाला अटक

bribe

घरकुल योजनेअंतर्गत अनुदान मंजूर करुन रक्कम मिळवून दिल्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्विकारणार्‍या दरी गावच्या महिला सरपंचास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या गेटजवळ स्विकारल्याप्रकरणी पथकाने पोलीस उपनिरीक्षकासह एकाला अटक केली. सरपंच अलका अंबादास गांगोडे (४२, र.दरी, ता.जि.नाशिक), पोलीस उपनिरीक्षक संदीप शांताराम ठाकरे, अब्दुल रहमान अब्दुल कादीर ऊर्फ अज्जे (रा.इमदाडनगर, जमजम रुग्णालयजवळ, मालेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पहिल्या घटनेनुसार, घरकुल योजनेअंतर्गत अनुदान मंजूर झाले होते. तक्रारदाराच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अनुदानापैकी १५ हजार रुपये अनुदान तक्रारदाराच्या आईच्या नावाने तक्रारदारास मिळाले. उर्वरित अनुदान मिळाले नव्हते. तक्रारदारास अनुदान मंजूर केले आणि अनुदानाची रक्कम मिळवून दिल्याच्या मोबादल्यात मंगळवारी (१३) सरपंच अलका गांगोडे यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा टाकला. तक्रारदाराकडून बुधवारी (दि.१४) ५ हजार रुपयांची लाच स्विकारताना पथकाने सरपंच गांगोडे यांना अटक केली.

दुसर्‍या घटनेनुसार, पोलीस उपनिरीक्षक संदीप शांताराम ठाकरे यांची नेमणूक मालेगाव पोलीस ठाण्यात आहे. तक्रारदाराविरुद्ध मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी संदीप ठाकरे यांनी अब्दुल अज्जे यांच्यामार्फत ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी २० हजार रुपये आधीच स्विकारल्याचे मान्य करुन उर्वरित ६० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पथकाने पडताळणी करुन सापळा रचला. संदीप ठाकरे याचेमार्फत अब्दुल अज्जे याने मंगळवारी (दि.१३) ६० हजार रुपये मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या गेटजवळ स्विकारताना पथकाने अटक केली. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.