Friday, August 7, 2020
Mumbai
28.8 C
घर महाराष्ट्र नाशिक बहिणीच्या प्रियकराचा भावाकडून खून; नाशिकमधील थरारक घटना

बहिणीच्या प्रियकराचा भावाकडून खून; नाशिकमधील थरारक घटना

Nashik
Nashik Murder case
मृत विवेक शिंदे

बहिणीसोबत प्रेमसंबंध ठेवल्याच्या कारणातून भावाने मित्रांच्या सहाय्याने प्रियकराचा काटा काढल्याची थरारक घटना जुन्या नाशकातील डिंगरअळी, संभाजी चौक परिसरात शनिवारी (दि.८) मध्यरात्री घडली. विवेक सुरेश शिंदे (२३) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी विवेकचा भाऊ रोहन सुरेश शिंदे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फरार आरोपींच्या शोधार्थ पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत. सुशांत वाबळे, शंभू गोरख जाधव, शिवा गोरख जाधव, नाम्या (पुर्ण नाव समजू शकले नाही) अशी खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या फरार संशयितांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, विवेक सुरेश शिंदे हा मित्र ओम राजेंद्र हादगेसोबत भीशीची रक्कम गोळा करण्यासाठी शनिवारी (दि.७) सायंकाळी घराबाहेर पडला. दुचाकीवरुन तो रात्री १२ वाजता जुने नाशिकमार्गे घराच्या दिशेने जात असताना संशयित सुशांत वाबळे, शंभू जाधवसह दोनजणांनी त्याचा रस्ता अडविला. त्यावेळी ओम हादगेने रोहन शिंदे यास कॉल करत सुशांत वाबळेने रस्ता अडविल्याची माहिती दिली. विवेकने त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतली. सुशांत वाबळे आणि शंभू जाधवने पुन्हा त्याला संभाजी चौकात एकटे असताना गाठले. त्याला संभाजी चौकाजवळील ऊर्दू शाळेच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नेत त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले.

ओमने दिलेल्या माहितीनुसार रोहन शिंदे संभाजी चौकात आले असता सुशांत वाबळेने विवेकला पकडलेले आणि शंभू जाधव विवेकवर वार करत असल्याचे दिसले. रोहनने मावस भाऊ अमित देसलेच्या मदतीने त्यांच्या तावडीतून विवेकची सुटका केली. त्यानंतर चौघे फरार झाले. विवेक गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी त्यास रोहने खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानुसार रोहनने विवेकला जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास मृत घोषित केले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजनकुमार सोनवणे करत आहेत.

तीन वर्षांपुर्वी होते प्रेमसंबंध

विवेकचे शंभू जाधवच्या बहिणीसोबत तीन वर्षांपुर्वी प्रेमसंबंध होते. जून २०१९ मध्ये विवकेचा शंभूच्या बहिणीसोबत केटीएचएम कॉलेजसमोर किरकोळ वाद झाला होता. याप्रकरणी शंभूच्या आईवडिलांनी विवेकविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर जाधव आणि शिंदे कुटुंबियांमध्ये समझोता झाला. मात्र, तेंव्हापासून शंभूला विवेकबद्दल राग होता, असे रोहन शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी पंचवटी खूनातील मुख्य संशयित

२०१६ मध्ये टकलेनगर येथे राहुल टाक याच्यावर हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार करून ठार केले होते. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात मुख्य संशयित आरोपी म्हणून सुशांत वाबळे आणि शंभू गोरख जाधव यांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना ठराविक कालावधीनंतर जामीन मंजूर केला होता.