घरमहाराष्ट्रनाशिकविद्यार्थ्यांना महापरीक्षेचा महा‘त्रास’

विद्यार्थ्यांना महापरीक्षेचा महा‘त्रास’

Subscribe

आस्तित्वात नसलेल्या नियमांचा कचाटा तापदायी

राज्यातील विविध विभागांमधील भरती प्रक्रिया एकाच ठिकाणी घेण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी सुरू झालेल्या महापरीक्षा वेब पोर्टलमुळे विद्यार्थ्यांचा त्रास कमी होण्याऐवजी वाढला आहे. पोर्टल चालू न होणे, हँग होणे, प्रवेश पत्र डाऊनलोड न होणे अशा मनस्तापासोबतच परीक्षा केंद्रनिहाय बदलणार्‍या नियमांचाही विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. प्रवेशपत्रात न दिलेले नियमदेखील विद्यार्थ्यांवर लादले जात असल्याने, राज्य सरकारनेच याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मेगाभरतीअंतर्गत सध्या तलाठी, वनरक्षक या पदांसाठी परीक्षा घेतल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना पोर्टलच्या त्रासासोबतच परीक्षा केंद्रावर होणार्‍या वेगळ्याच जाचाला सामोरे जावे लागत आहे. उमेदवारांच्या खिशात काही नको, हातात घड्याळ नको, शूज मोजे या सर्व गोष्टींवर बंदी असल्याने विद्यार्थ्यांना या गोष्टी ठेवायच्या कुठे हा प्रश्न असतो. काही परीक्षा केंद्रांवर व्यवस्थित सुविधा आहेत. मात्र, काही केंद्रांवर विद्यार्थ्यांना केंद्राबाहेर कुठेतरी सोबतच्या वस्तू ठेवाव्या लागत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

साधारण दीड वर्षांपूर्वी महापरीक्षा पोर्टल सुरू करण्यात आले आहे. तेव्हापासूनच उमेदवारांमध्ये या पोर्टलबाबत निराशा आहे. सर्वप्रथम फॉर्म भरत असताना प्रत्येक विभागाच्या परीक्षेच्या वेळी स्वतंत्र रजिस्ट्रेशन करणे, जिल्हा परिषदेच्या भरतीप्रक्रियेत प्रत्येक पदासाठी वेगळी फी आकारणे, अभ्यासक्रमानुसार प्रश्न नाही, कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या परीक्षेमधील प्रश्नच रद्द करणे या सारख्या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांना आणखीच मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऑनलाईन परीक्षा घेताना त्यांचे परीक्षा केंद्र हे ठराविक असतात. त्यामुळॆ बहुतेक वेळा विद्यार्थ्यांना संगणक अचानक बंद होणे, वेळेवर हँग होणे यासोबतच पर्यवेक्षकांच्या जाचक अटींना सामोरे जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांची मानसिकता परीक्षेच्या वेळी बिघडत आहे.

विद्यार्थ्यांना तक्रारी असल्यास 1800-3000-7766 या क्रमांकावर आणि ई-मेल [email protected] संपर्क करा.

- Advertisement -

अशी होते अडवणूक

प्रवेशपत्रात नमूद नसतानाही परीक्षाकेंद्रावरील कर्मचार्‍यांकडून बूट, मोजे, चप्पल बाहेर काढण्याची सक्ती केली जाते. त्याचसोबत साधे घड्याळ, पाण्याची बाटली आदी साहित्य बाहेरच ठेवावे लागते. काही केंद्रांवर या वस्तू ठेवण्यासाठी व्यवस्था केलेली असते, पण काही ठिकाणी नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या जोखमीवर बाहेर ठेवून परीक्षा द्यावी लागते. यामुळे केंद्रांवर अशी व्यवस्था नसल्याने उमेदवारांना स्वतःच्या जबाबदारीवर सर्व साहित्य बाहेर ठेवावे लागत आहे, यामुळे पेपर सोडवत असताना लक्ष विचलित होत आहे.

सर्व्हर डाऊनमुळे अडचणीत वाढ

हॉल तिकीट डाउनलोड व्हायला वेळ लागतो. परीक्षेचे प्रवेशपत्र जरी पंधरा दिवस आधी वेबसाईट वर आले तरी देखील प्रत्येक वेळी सर्व्हर डाऊन होत आहे. रात्री उशिरा डाउनलोड केले तेव्हा झाले. पोर्टल सतत हँग होत आहे. महापरीक्षेने सर्व प्रश्नपत्रिका पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या, पण त्या मिळवण्यासाठी सुद्धा सर्व्हर काम करत नाही.– पंकज गिरासे, परीक्षार्थी

केंद्रावरच्या त्रासामुळे एकाग्र होऊ शकलो नाही

जवळील सर्व साहित्य बाहेर ठेवावे लागल्याने परीक्षेमध्ये एकाग्र होऊ शकलो नाही. प्रवेशपत्रामध्ये नमूद नसलेले नियम सुद्धा केंद्रप्रमुखांनी लादले. परीक्षा महत्वाची असल्याने त्यांच्यासोबत हुज्जत न घालता आहे त्या परिस्थितीत परीक्षा द्यावी लागली. परीक्षा देत असताना एकाग्र होऊ न शकल्याने पेपर अवघड गेला. -निखील तावडे, परीक्षार्थी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -