घरमहाराष्ट्रनाशिकतीन अपघातांनंतर घाबरलेल्या चालकाची पुलावरून उडी

तीन अपघातांनंतर घाबरलेल्या चालकाची पुलावरून उडी

Subscribe

अंबड येथे एक ठार, तीन जखमी; चालकही अत्यवस्थ

चुंचाळे शिवारात लग्नाला कुटुंबासह आलेल्या युवकाने एक्स्लो पाँईटजवळ पायी चालणार्‍या दोघांना धडक दिली. तेथून घाबरून पळ काढताना पुढे एका दुचाकीलाही जोरदार धडक दिल्याने त्यात एक जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झालेत. लोकांनी कारचा पाठलाग केल्याने घाबरलेल्या कारचालकाने नाशिक पुणे महामार्गावरील चेहडी पुलावर गाडी थांबवून नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत.

सोमनाथ बाळू डेंगळे (३२, रा. बाभूळगाव, वैजापूर) हा कुटुंबासह चुंचाळे येथे नातेवाईकाच्या लग्नाला त्याचे मित्र राजेंद्र कुंजीर यांची निसान कंपनीची डस्टर गाडी (एमएच-२०, डिजे ६९१३) घेऊन आला होता. घरच्यांना लग्नात सोडून तो पुढे जात असताना एक्स्लो पाँईटजवळ त्याने रस्त्याने पायी जाणार्‍या लोकांना पाठीमागून धडक दिली. यात अशोक ओमकार जाधव (६१, रा. धुळे) यांचा जागीच मृत्यू झाला. सविता चंद्रशेखर चव्हाण (३८, मांढळ, अंमळनेर) यांनाही गंभीर दुखापत झाली. यामुळे घाबरून सोमनाथ याने तेथून पळ काढत असतानाच समोर असणार्‍या दुचाकीलाही धडक दिली. यात अशोक भुजबळ व निर्मला भुजबळ दाम्पत्य गंभीर जखमी झाले. यामुळे काही वाहन चालकांनी सोमनाथच्या गाडीचा पाठलाग केला. ताब्यात सापडलो, तर लोक मारतील, या भीतीने प्रचंड घाबरलेल्या सोमनाथने शहरातून जागा मिळेल, त्या दिशेने भरधाव वेगाने नाशिक- पुणे महामार्गाने कार नेली.

- Advertisement -

चेहेडी गावाजवळ दारणा नदीच्या पुलावर कार उभी करून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने पुलावरून खाली उडी मारली. यात सोमनाथ याच्या पायाचे हाड मोडले, डोक्याला गंभीर जखम झाल्याने बेशुद्ध पडला, याबाबत नागरिकांनी नाशिकरोड पोलिसांना माहिती दिली, नाशिकरोड पोलिसांनी कार ताब्यात घेत सोमनाथला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी लोणी येथे दाखल करण्यात आले आहे. अंबड पोलीस ठाण्यात सोमनाथच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे तपास करत आहे. दरम्यान अंबड पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच कारचालकाला पकडण्यासाठी वायरलेस वर गाडीचे वर्णन व क्रमांकाची माहिती दिली गेली. अपघात एक्स्लो पाँईट येथे झाला तेथून चेहेडी पुलापर्यंत अनेक ठिकाणी बंदोबस्त असताना तो पोलिसांच्या हाती कसा लागला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -