‘नीट’मुळे सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

एमएचटी सीईटी २ ते१३ मे दरम्यान ग्रुपनिहाय दोन सत्रांत

Nashik
CET

इंजिनिअरिंग व फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक एमएचटी- सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार२ ते १३ मे दरम्यान ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे. मेडीकल क्षेत्राशी निगडित नीट परीक्षा ५ मेस होत असल्याने ४ व ५ मेस दोन्ही सत्रांतील, तर ६ मेस सकाळच्या सत्रात सीईटी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या बोर्डाची परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यींनी आता प्रवेश परीक्षांवर लक्ष केंद्रित केले आहे. सीईटी परीक्षेसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित (पीसीएम), भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र (पीसीएमबी) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी) अशा तीन गटांत परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार परीक्षेचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. दोन सत्रांत ही परीक्षा होईल. सकाळच्या सत्रात सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ही परीक्षा घेतली जाणार आहे. दुपार सत्रात पीसीएमबी गटाची परीक्षा दुपारी १२ पासून होईल. तर अन्य तीन विषयांचा समावेश असलेल्या गटाची परीक्षा दुपारी २ ते ६.४५ या वेळेत होणार आहे.
सकाळच्या सत्रात सकाळी ७.३० पासून ८.३० पर्यंत प्रवेश दिला जाईल. दुपारच्या सत्रात दुपारी २ वाजता सुरू होणार्‍या परीक्षेसाठी १२.३० ते १.३० दरम्यान प्रवेश दिला जाणार आहे. विषयनिहाय दीड तासांचे सलग पेपर होतील.

प्रवेशपत्र २५ एप्रिलपासून

विद्यार्थ्यांना आवश्यक ओळखपत्राच्या मूळ प्रतिसोबत परीक्षेला प्रविष्ट झाले असल्याने प्रवेशपत्र सादर करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना २५ एप्रिलपासून २ मे या कालावधीत प्रवेशपत्र (ऍडमिट कार्ड) संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here