मुख्यमंत्री व पवार यांच्या आज जिल्ह्यात सभा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गुरुवारी (दि. १७) सटाणा, निफाड, नांदगाव तालुक्यांत तर नाशिक शहरातील नाशिक पूर्व विधानसभा व नाशिक पश्चिम विधानसभेतील उमदेवारांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे.

NASHIK

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गुरुवारी (दि. १७) सटाणा, निफाड, नांदगाव तालुक्यांत तर नाशिक शहरातील नाशिक पूर्व विधानसभा व नाशिक पश्चिम विधानसभेतील उमदेवारांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सायंकाळी सातला गंगाघाटावर भाजीपाला बाजार पटांगणावर सभा होत आहे.

सकाळी १० वाजता सटाणा, दुपारी १२.३० वाजता पिंपळगाव बसवंत, दुपारी ३ वाजता नांदगाव येथे सभा होणार आहे. देवळाली विधानसभेतील उमेदवार सरोज अहिरे व नाशिक पूर्व विधानसभेतील उमेदवार बाळासाहेब सानप यांच्या प्रचारार्थ संयुक्त सभा सायंकाळी ५ वाजता पंचवटी मधील मखमलाबाद येथे तर नाशिक पश्चिम विधानसभेतील उमेदवार डॉ.अपूर्व हिरे यांच्या प्रचारार्थ सायंकाळी ७ वाजता सिडको येथील पवननगर येथे सभा होणार आहे. विधानसभा निवडणूक प्रचाराचा ज्वर आता चांगलाच चढू लागला आहे. त्यातही नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्वमधील लढतीत चुरस निर्माण झाली आहे. पश्चिम मतदारसंघात भाजपचा उमेदवार असतांनाही शिवसेनेच्या बंडखोराने येथे आव्हान उभे केले आहे. पूर्वमध्ये भाजपच्या आमदाराला डावलून मनसेतून आलेल्यांना उमेदवारी दिली गेल्याने येथे राष्ट्रवादी विरूद्ध भाजपचा सामना होत आहे. राज्यभरात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी सभांमधून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. त्यामुळे या आरोपांना पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.