विखे-थोरातांचा संघर्षाचा बार फुसकाच

राधाकृष्ण विखे- पाटील व आमदार बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्षाचा बार फुसकाच ठरला आहे. दोघांमधील गुप्त समझोता एक्सप्रेस पुन्हा एकदा धावली असल्याचे दिसत आहे. थोरातांनी विखे यांच्याविरुद्ध प्रबळ उमेदवार दिला ना विखे यांनी थोरात यांच्याविरुद्ध. यामुळे संघर्षाच्या गप्पा हवेतच विरल्याने दोन्ही नेत्यांचे समर्थक मात्र, सैरभर झाले आहेत.

NASHIK
Thorat_Vikhe
विखे-थोरातांचा संघर्षाचा बार फुसकाच

अंकुश बूब, संगमनेर

राधाकृष्ण विखे- पाटील व आमदार बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्षाचा बार फुसकाच ठरला आहे. दोघांमधील गुप्त समझोता एक्सप्रेस पुन्हा एकदा धावली असल्याचे दिसत आहे. थोरातांनी विखे यांच्याविरुद्ध प्रबळ उमेदवार दिला ना विखे यांनी थोरात यांच्याविरुद्ध. यामुळे संघर्षाच्या गप्पा हवेतच विरल्याने दोन्ही नेत्यांचे समर्थक मात्र, सैरभर झाले आहेत.

विखे- थोरात यांच्यातील संघर्ष जुना आहे. मात्र, कुठपर्यंत ताणायचे हे दोन्ही नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. संघर्षाच्या गप्पानंतर दोघांनी एकमेकांना छुपे सहकार्यच केल्याची अनेक उदाहरणे आहेत. दोघेही काँग्रेसमध्ये होत, तेव्हाही संघर्ष होता. आता विखे भाजपमध्ये गेल्याने या संघर्षाला आणखी धार येईल, असे वाटत होते. काँग्रेसमध्ये असताना विखे आमदार थोरातांना नेहमी भारी भरले होते. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, या शिखर संस्थांमध्ये अनेकांनी अनुभवले आहे.

एकमेकांचे विरोधक दिसत असले तरी एकमेकांना त्यांनी सहकार्यच केले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अनेकदा याचा प्रत्यय आला आहे. (स्व.) बाळासाहेब विखे यांनी पक्षांतर करून शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाच दिवशी झाल्याने त्यावेळी टी.व्ही फॅक्टर गाजला होता टी.व्ही म्हणजे थोरात-विखे या निवडणुकीत टीव्ही चालवा असा, प्रचार संगमनेरात केला होता. नंतरच्या काही निवडणुकांमध्येही दोघांनी एकमेकांना छुपे सहकार्य केले.

लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढविली. याकाळात आमदार थोरात यांनी विखे परिवारावर जोरदार टीका केली. निवडणूक संपल्यानंतर खासदार सुजय विखे यांनी संगमनेरातील वेगवेगळ्या सभेमध्ये आमदार थोरातांवर टीका केली. लोकसभेची परतफेड केली जाईल, असा इशारा दिला. विधानसभा निवडणुकीत विखे पूर्ण ताकद थोरातांच्या विरोधात लावतील, असे वातावरण होते. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपली आहे. दोन्ही मतदारसंघात जे उमेदवार उभे केले आहे, यावरून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.

दोघांकडून मार्ग सोपे

संगमनेर मतदारसंघात शालिनी विखे यांना उमेदवारी देऊन थोरातांविरुद्ध कडवे आव्हान उभे करण्यात येईल, असे अनेकांना वाटत होते. विखेंच्या विरोधात आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू होती. शिर्डी मतदारसंघात विखेंच्या विरोधात सुरेश थोरातांना उमेदवारी दिली. शिर्डीत अनेक दिग्गज असताना सुरेश थोरात यांना उमेदवारी दिली. ते आमदार थोरात यांचे चुलत बंधू असून, त्यांनी संगमनेर पंचायत समिती सदस्य म्हणून पाच वर्षे काम केले आहे. संगमनेरातही अनेक जण थोरातांविरुद्ध लढण्यासाठी इच्छुक होते. सर्वांना डावलून साहेबराव नवले यांना उमेदवारी देण्यात आली. दोघांनीही आपले मार्ग सोपे केले अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.

संपर्क कार्यालय ओस पडले

विखे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरात संपर्क कार्यालय सुरू केले. कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली. विखेंची ताकद मिळेल, या आशेने इच्छुक उमेदवारही या कार्यालयात फिरकत होते. मात्र अनपेक्षितपणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यालय अचानक ओस पडले.