घरमहाराष्ट्रनाशिक‘भाजपेयीं’च्या श्रेयवादाचा महापालिका प्रशासनाला धसका

‘भाजपेयीं’च्या श्रेयवादाचा महापालिका प्रशासनाला धसका

Subscribe

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अजून शिथीलही झालेली नसताना महापालिका प्रशासनाला मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या कोंडीची धास्ती वाटत आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अजून शिथीलही झालेली नसताना महापालिका प्रशासनाला मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या कोंडीची धास्ती वाटत आहे. या निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे श्रेयवादाची लढाई आतापासूनच सुरू झाली आहे. यात भाजपचे नगरसेवक आणि आमदार पुढे असल्याचे दिसते. परिणामी पक्षांतर्गत स्पर्धेलाही जोरदार उकळी फुटली आहे. या लढाईत नक्की कोणाचे ऐकावे, असा यक्ष प्रश्न प्रशासनाला पडलेला दिसतो.

लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले असले तरीही मतमोजणी मात्र २३ मे रोजी होणार आहे. नियमाप्रमाणे मतमोजणीपर्यंत आचारसंहिता लागू असते. मतदान आणि मतमोजणीतील अंतर अधिक असल्यास आचारसंहिता काही प्रमाणात शिथील होते. आचारसंहितेमुळे निविदांची थांबवलेली प्रक्रिया या काळात राबवता येते; परंतु निविदा मंजूर करून कार्यादेश देता येत नाही. नाशिक महापालिकेत सध्या आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे प्रशासनाकडे नियोजनाशिवाय अन्य कोणतीही कामे नाहीत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच काही नगरसेवकांनी विकासकामांसाठी तगादा लावला आहे. या निवडणुकीसाठी अनेक नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यात शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या मंडळींनी आता प्रशासकीय कार्यालयांत खेटा मारण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत नेमके कोणाचे ऐकावे, असा प्रश्न प्रशासनाला आहे. सत्तेत भाजपच असल्यामुळे प्रशासकीय कोंडीत अधिक वाढ झाली आहे.

- Advertisement -

प्रमोद महाजन उद्यान

गंगापूर रोडवरील स्व. प्रमोद महाजन उद्यानाच्या व्यवस्थेवर आमदार देवयानी फरांदे यांचा यापूर्वी प्रभाव होता. मात्र, चार वार्डांचा एक प्रभाग झाल्यानंतर आता या प्रभाग क्रमांक ७ मधील चारही नगरसेवकांचा या उद्यानावर वरचष्मा आहे. उद्यानात सुविधा पुरवण्यासाठी फरांदे प्रयत्नशिल असताना दुसरीकडे याच पक्षातील स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर – आडके यांनीही पाठपुरावा सुरू केला आहे. मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात हिमगौरी आडके या प्रा. फरांदे यांच्या पक्षांतर्गत स्पर्धक असू शकतात. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनीही या उद्यानावर लक्ष केंद्रित केल्याने प्रशासनाची आता कोंडी झाली आहे.

आकाशवाणीजवळील जॉगिंग ट्रॅक

आकाशवाणी मनोर्‍याजवळील जॉगींग ट्रॅकच्या व्यवस्थेवर आतापर्यंत आमदार सीमा हिरे यांचा प्रभाव होता. मात्र, काही महिन्यांपासून भाजपच्याच नगरसेविका स्वाती भामरे यांनी या ट्रॅकच्या विकासासाठी विविध प्रस्ताव सादर केले आहेत. आमदार फरांदे यांनी या परिसरात जलतरण तलावाला मंजुरी मिळवली असून कामाला सुरुवातही झाली आहे. या पार्श्वभूमीवर या ट्रॅकच्या विकास कामांबाबत कोणाच्या प्रस्तावाला प्राधान्य द्यावे असा प्रश्न, महापालिका प्रशासनाला पडला आहे.

- Advertisement -

नवीन नाशिकमधील पेलिकन पार्क

मोरवाडीजवळ असलेल्या पेलिकन पार्कचा म्हणजेच सेंट्रल पार्कच्या विकासासाठी साडेनऊ कोटी रुपयांचा निधी भाजपचे आमदार सीमा हिरे यांनी मंजूर करून आणला आहे. दुसरीकडे भाजपचेच नगरसेवक मुकेश शहाणे यांनी हे काम आपल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा केला आहे. महासभेत आपण आंदोलन केल्यानंतर कामाला गती मिळाल्याचे शहाणे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पेलिकनला नमो उद्यान नाव द्यायचे की सेंट्रल पार्क म्हणायचे यावरूनही या दोघांत वाद झाला होता. त्यामुळे पेलिकन पार्कचे नाव कुणी काढले तरी प्रशासनाच्या अंगावर शहारे उभे राहत असल्याचे एका अधिकार्‍याने खासगीत सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -