‘त्या’ लघुलेखकाचा महापालिकेस ‘पदस्पर्श’

गेल्या १० वर्षांपासून महापालिकेत कामावर न येताच पगार घेणारा रवींद्र सोनवणे या लघुलेखकाचा ‘पदस्पर्श’ अखेर बुधवारी २० मार्चला महापालिकेस झाला. सभागृहनेत्यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर संबंधित कर्मचारी कामावर रुजू झाला. नगरसचिवांनी लघुलेखकाला खुलासा करण्याची नोटीस दिली असून आयुक्तांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Nashik
Rajiv-gandhi-bhavan-NMC
नाशिक महानगरपालिका

गेल्या १० वर्षांपासून महापालिकेत कामावर न येताच पगार घेणारा रवींद्र सोनवणे या लघुलेखकाचा ‘पदस्पर्श’ अखेर बुधवारी २० मार्चला महापालिकेस झाला. सभागृहनेत्यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर संबंधित कर्मचारी कामावर रुजू झाला. नगरसचिवांनी लघुलेखकाला खुलासा करण्याची नोटीस दिली असून आयुक्तांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिकेतील नगरसचिव विभागात लघुलेखक म्हणून कार्यरत असलेला रवींद्र सोनवणे हा कर्मचारी गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेत फिरकलाच नसल्याचा धक्कादायक प्रकार सभागृह नेता दिनकर पाटील यांनी उघडकीस आणला आहे. हा कर्मचारी महापालिकेत न येता राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याच्या दिमतीला असतो. मात्र अन्य कर्मचार्‍यांमार्फत हजेरी पुस्तिकेवर बनावट स्वाक्षरीच्या आधारे हजेरी नोंदवली जात असल्याचाही पुरावा सादर करीत या कर्मचार्‍याकडून मागील दहा वर्षाचे वेतन वसूल करावे तसेच प्रशासन प्रमुख, आस्थापना अधीक्षक व नगरसचिव यांच्यावर नियमानुसार तत्काळ प्रशासकीय कारवाई करण्याची मागणीही पाटील यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच बुधवारी सोनवणे हे महापौरांच्या रामायण निवासस्थानी कामावर हजर झाले. ते प्रथमच कामावर दिसल्याचे येथील कर्मचार्‍यांनी सांगितले. दिनकर पाटील यांनी नोंदवलेल्या आक्षेपांचा खुलासा करण्याची नोटीस नगरसचिवांनी सोनवणे यांना दिली आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश बुधवारी दिलेत.

साथ देणार्‍या कर्मचार्‍याचीही व्हावी चौकशी

सोनवणे हे कामावर रुजू नसताना भलताच कर्मचारी हजेरी पुस्तिकेत सोनवणे यांची बनावट स्वाक्षरी करून हजेरी लावत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. महापालिकेत सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने बनावट स्वाक्षरी करणारा कर्मचारी कोण हे सहजपणे समजू शकते. त्याचप्रमाणे नगरसचिव विभागाला दहा वर्षात आपला एक कर्मचारी कामावरच येत नाही, त्याची हजेरी मात्र असते, हे नगरसचिवांना का लक्षात आले नाही, याचीही चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.

भाजप पदाधिकार्‍याची सूचना

धक्कादायक बाब म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या एका पदाधिकार्‍याने पत्र देत संबंधित कर्मचार्‍याची बायोमॅट्रीक हजेरी लावू नये, अशी सूचना प्रशासनाला केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याच्या दिमतीला असलेल्या या कर्मचार्‍याचा ‘भाजपेयीं’ना इतका कणव का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here