युतीतील बेबनावाचा दोन्ही पक्षांना फटका?

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी व नगरसेवकांनी राजीनामे देऊन भाजपविरुद्ध शड्डू ठोकले आहेत. भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांनीही त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

NASHIK
Shivsena_BJP

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी व नगरसेवकांनी राजीनामे देऊन भाजपविरुद्ध शड्डू ठोकले आहेत. भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांनीही त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. मात्र, शिवसेना भाजपमधील हा बेबनाव वेळीच थांबवला नाही, तर दोघांनाही प्रत्येकी पाच-पाच मतदारंसघात याचा फटका बसण्याची शक्यता २०१४मधील मतांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे चारही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते. यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येक पक्षाची ताकद किती आहे, हे आजमावण्याची संधी मिळाली होती. यावेळी भाजप-शिवसेना महायुती करून एकत्र लढत आहेत, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच आघाडी आहे. मात्र, नाशिक शहरातील एकही जागा शिवसेनेच्या वाट्याला न गेल्याने नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेत प्रचंड असंतोष आहे. शिवसेनेेचे महापालिकेतील गटनेते विलास शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी करून भाजपच्या आमदार सीमा हिरे यांना आव्हान दिले आहे. तसेच सर्व पदाधिकार्‍यांसह शिवसेनेच्या ३६ नगरसेवकांनी पक्ष्रप्रमुखांकडे राजीनामे दिले आहेत. शिवसेनेच्या या पावित्र्याविरोधात आमदार सीमा हिरे यांनी शिवसेनेला सडेतोड उत्तर देऊन याचा विजयावर परिणाम होणार नसल्याचा दावा केला. मात्र, या वादाचा परिणाम आपल्या मतदारंसघात होऊन आपल्याला फटका बसणार नाही ना, अशी भीती जिल्ह्यातील इतर उमेदवारांना वाटत आहे.

२०१४ च्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाला मिळालेल्या मतांवर नजर टाकली असता, शिवसेनेला निफाड, दिंडोरी, इगतपुरी, देवळाली, येवला या मतदारसंघांमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपच्या मतांची तिव्र गरज असल्याचे दिसते. तर भाजपलाही यश मिळवण्यासाठी नाशिक मध्य, पश्चिम, पूर्व, चांदवड व बागलाण या पाच मतदारसंघांत शिवसेनेच्या मदतीची गरज आहे. नांदगाव, मालेगाव बाह्य व सिन्नर या तीन मतदारसंघांतील भाजपचे उमेदवार पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे तेथील भाजपच्या शक्तीचा अंदाज येत नाही. त्या तीन जागा वगळल्या तर शिवसेना व भाजपला प्रत्येकी पाच ठिकाणी एकमेकांची गरज आहे. मात्र, भाजप व शिवसेना नेत्यांच्या एकमेकांना शह देण्याच्या राजकारणाचा आपल्याला फटका बसतो की काय, असा धसका या उमेदवारांनी घेतला आहे. वरिष्ठ नेत्यांनी वेळीच हा प्रश्न सोडवावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. आता या दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते या प्रश्नाकडे कसे बघतात, यावर त्या उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.