दरोड्याच्या तयारीतील गुन्हेगारांची टोळी जेरबंद

atm robbery
प्रातिनिधिक फोटो

जेलरोड भागात शनिवारी (दि.६) पहाटे दरोड्याच्या तयारीत असलेल्या तडीपार गुंडासह पाचजण जेरबंद करण्यात नाशिकरोड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून कोयते व इतर साहित्य जप्त केले आहे. उमेश संजय बुचुडे (२२, रा. धनगर गल्ली, देवळाली गाव), ऋषिकेश अशोक निकम (१९, रा. मालधक्का रोड, चंद्रमोरे गल्ली), सागर सुरेश म्हसके (२२, रा. शिवगंगा अपार्टमेंट, जेलरोड), अनिकेत राजू जॉन (२१, रा. सुभाष रोड, भारती मठ), सिद्धांत सचिन धनेधर (१९, रा. चव्हाण मळा, जयभवानी रोड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पकडलेल्या पाच संशयितांपैकी चारजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी (दि.६) पहाटे जेलरोड पाण्याच्या टाकीजवळ नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक मनिषा राऊत व पोलीस कर्मचारी गस्तीवर असताना जेलरोड पाण्याच्या टाकीकडून बिटकोकडे दोन दुचाकी वेगाने जाताना दिसल्या. पोलिसांनी दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीचालक वेगाने पळून गेला. पोलिसांनी दुचाकींचा पाठलाग केला. यावेळी चारजण असलेल्या दुचाकीच्या (एम.एच.१५ जी.डी. ४४३४) चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी घसरली. पोलीस जवळ येत असल्याचे समजताच एकजण अंधाराचा फायदा घेत पळून गेला. पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन कोयते, नायलॉन दोरी व मिरची पूड जप्त केली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरिक्षक मनिषा राऊत, कोकाटे, विशाल पाटील, विखे, संतोष घुगे, जुनेद शेख यांनी केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरोडेखोर सराईत गुन्हेगार
परिमंडळ दोनचे पोलीस उपआयुक्तांनी पाच महिन्यांपुर्वीच सागर म्हस्के यास तडीपार केले आहे. तो शनिवारी रात्री पुन्हा दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला पकडले. दुचाकी घसरून पडल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.