घरमहाराष्ट्रनाशिकचुकीच्या गोष्टींवर आसूड ओढा; पण चांगल्याचे कौतुकही करा - पालकमंत्री महाजन

चुकीच्या गोष्टींवर आसूड ओढा; पण चांगल्याचे कौतुकही करा – पालकमंत्री महाजन

Subscribe

वर्तमानपत्रांनी चुकीच्या गोष्टींवर आसूड जरुर ओढावेत, मात्र चांगल्याला चांगलेही म्हणावे, त्यांना शाबासकीही द्यावी, असे प्रतिपादन नाशिकचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

वस्तुनिष्ठ बातमीला फाटा देऊन सत्यता न पडताळता भडक आणि चुकीच्या बातम्या छापणारी काही वृत्तपत्रे आहेत. अशा वृत्तपत्रांवरील वाचकांचा विश्वास काही दिवसांतच कमी होतो. वर्तमानपत्रांनी चुकीच्या गोष्टींवर आसूड जरुर ओढावेत, मात्र चांगल्याला चांगलेही म्हणावे, त्यांना शाबासकीही द्यावी, असे प्रतिपादन नाशिकचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. ‘दैनिक आपलं महानगर’च्या नाशिक आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत माध्यमांमुळे ते कसे वेळोवेळी अडचणीत आले याचे किस्सेही सांगितले.

महाकवी कालिदास कलामंदिरात ‘आपलं महानगर’चा शानदार प्रकाशन सोहळा रंगला होता. यावेळी शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि कृषी विकासाला चालना देणार्‍या नाशिक नगरीत ‘आपलं महानगर’चे स्वागत आहे, असे सांगत पालकमंत्री म्हणाले की, निसर्गाने नटलेला हा बहुरंगी जिल्हा असून समृध्दी महामार्गाच्या रुपाने औद्योगिक प्रगतीही साध्य होणार आहे. येथे डाळिंब, द्राक्ष, कांदे यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. हाडाचे शेतकरी आणि कष्टकर्‍यांनी या जिल्ह्याच्या मातीत घाम गाळला आहे. या पार्श्वभूमीवर ‘आपलं महानगर’ जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच हातभार लावेल, असा विश्वास वाटतो.
३० वर्षांपासून या दैनिकाने मुंबईत आपले पाय घट्ट रोवलेले असून, अतिशय लोकप्रिय दैनिक म्हणून त्याचा चांगला लौकिक आहे. मात्र, अन्य काही वर्तमानपत्रे टी-२० सामन्याप्रमाणे कमी काळात चौकार आणि षटकार मारण्याचा प्रयत्न करतात. पण वस्तुनिष्ठता तपासण्याचे भान या मंडळींना राहत नाही. अशी पत्रकारिता फार काळ चालत नाही. वाचकांना अशा बातम्या ताप्तुरत्या स्वरुपात वाचायला आवडतात. पण काही काळात खरे आणि खोटे त्यांनाही कळते. त्यामुळे त्यांचा अशा वर्तमानपत्रांवरील विश्वास उडतो. अशा परिस्थितीत निरपेक्ष पत्रकारिता करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

रिव्हॉलवरने मला कुठल्या कुठे पोहोचवले

कॅमेर्‍यांंच्या नजरेतून काहीही लपत नाही. माझ्या कमरेला लावलेले रिव्हॉल्वर कॅमेर्‍यांना दिसले आणि या घटनेने मला कुठल्या कुठे पोहोचवले. माझ्या अमेरिका आणि लंडनच्याही मित्रांनी मला फोन करुन रिव्हॉल्वर चमकत असल्याची जाणीव करुन दिली, असे पालकमंत्र्यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला. वर्तमानपत्रांनी थंडपणा सोडायला हवा, असा सल्ला भाजपच्या माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांना दिला. पण एक लक्षात ठेवा की, तुमच्या या सल्ल्याने हे लोक आपलीच बिनपाण्याने करतील, असे सांगतानाच गिरीश महाजन यांनी यापुढे कोणत्याही वर्तमानपत्राच्या प्रकाशन सोहळ्यात असे सल्ले न देण्याची मिश्कील सूचनाही केली.
आपलं महानगरची निर्भिड पत्रकारिता ३० वर्षांपासून सुरु आहे. या परंपरेचे आम्ही पाईक असल्यामुळे आम्ही थंड बसणार नाही, अशी नाशिककरांना हमी देतो. मात्र, थंड बसणार नाही याचा अर्थ उगाचच आम्ही कोणाच्या मागेही लागणार नाही. विकासात्मक पत्रकारितेसाठी आमचा कायम प्रयत्न राहिल. सत्ताधारी चुकले तर आम्ही आसुड ओढू आणि विरोधकांनी टिंगळटवाळीच करायचे ठरवले तर त्यांचाही यशेच्छ समाचार घेऊ. नाशिकला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या रुपाने तरुण आणि डॅशिंग तसेच हसतमुख नेतृत्व लाभले आहे. महाजन यांच्याकडे विकासाची आस असून, त्याचा नाशिक जिल्ह्याला निश्चितच फायदा होत आहे, असे विचार ‘आपलं महानगर’चे संपादक संजय सावंत यांनी मांडले.

नाशिकच्या विकासास नक्कीच हातभार : महापौर

महापौर रंजना भानसी म्हणाल्या की, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी देवी गडामुळे नाशिकचे महत्व अन्य शहरांपेक्षा वेगळे आहे. रामाची नगरी म्हणून देखील शहराची ओळख आहे. या नगरीत ‘आपलं महानगर’ या दैनिकाचे स्वागत आहे. आगामी काळात हे दैनिक नाशिकच्या विकासास नक्कीच हातभार लावेल यावर माझा विश्वास आहे. माझे नम्र सूचना आहे की, आमच्याकडून काही चुकले तर नक्कीच कान पकडा. पण कोणी चांगले काम केले तर त्याच्या पाठीवर शाबासकीची थापही द्या. खरे तर वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. मला वैयक्तिकरित्या वर्तमानपत्रांचे नेहमीच चांगलेच सहकार्य लाभले आहे. वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सत्यता पडताळून नाशिकमधील वर्तमानपत्रे माझ्या पाठीशी उभे राहिले.

वृत्तपत्रांची विश्वासार्हता टिकून : डॉ. प्रदीप पवार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते डॉ. प्रदीप पवार म्हणाले, राज्यात मुंबई, पुणे व नाशिक हा विकासाचा त्रिकोण निर्माण झाला असून, नाशिकला समृद्ध सांस्कृतिक व धार्मिक वारसा लाभला आहे. मराठी पत्रकारितेचा समृद्ध वारसा ऑनलाइनच्या जमान्यात मागे पडतो की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. नवीन पिढीच्या हातात मोबाईल आल्यामुळे वृत्तपत्राचे वाचक कमी झाल्याचे सांगितले जाते. मात्र,विश्वासार्हतेच्या बळावर आजही वृत्तपत्रांचे अस्तित्व आणि दरारा टिकून आहे. तसेच दिवसागणिक तो वृद्धिगंत होत असल्याचे जाणवते. शाश्वत वाचणाची सवय वृत्तपत्रांनी लावली. लेखणीचे महत्व आपण सर्वजण जाणतो. नाशिकमध्ये अनेक संपादकांच्या नावे वृत्तपत्र ओळखले जाते. ही विश्वासार्हता टिकवून ठेवत वृत्तपत्रांची वाटचाल सुरू असून, ‘आपलं महानगर’ देखील ही विश्वासार्हता जोपासून भविष्यात नाशिककरांना दिशादर्शकाचे काम करेल, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते डॉ.प्रदीप पवार यांनी व्यक्त केला.

लक्षवेधी…

पारंपरिक महाराष्ट्रीय वेशभूषेतील युवतींकडून पाहुण्यांचे गुलाबपुष्प व पेढा देऊन स्वागत.
नाशिक ढोलताशाच्या जल्लोषपूर्ण नादाने उत्साह भरला.
प्रवेशद्वाराजवळील चित्रकार नारायण चुंबळे यांनी ‘आपलं महानगर’ शब्द रेखाटलेली रांगोळी लक्ष वेधून घेत होती.
सभागृहाबाहेर ‘आपलं महानगर’चा फलक फुग्यांना हवेत सोडण्यात आले.
शुभारंभाप्रसंगी गणेश वंदनेसह झालेल्या नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत.
पुष्पगुच्छांऐवजी रोप देऊन मान्यवरांचे स्वागत.
नाशिक आणि आपलं महानगर दैनिकाचं नातं सांगणार्‍या ध्वनिचित्रफितीला उत्स्फूर्त दाद.
पहिला अंक पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अंक हाती पडताच पाने चाळण्यास सुरवात झाली.
मोठ्या आकारातील अंकाचे प्रकाशन होताच सभागृहात टाळ्यांचा उत्स्फूर्त कडकडाट.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -