घरमहाराष्ट्रनाशिकराहाता तालुक्यात बालकाचा होरपळून मृत्यू

राहाता तालुक्यात बालकाचा होरपळून मृत्यू

Subscribe

शिर्डीच्या राहाता तालुक्यातील कोल्हार येथे शॉर्टसर्किटमुळे छपराला लागलेल्या आगीत आठ वर्षाच्या बालकाचा होरपळून मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

शिर्डीच्या राहाता तालुक्यातील कोल्हार येथे शॉर्टसर्किटमुळे छपराला लागलेल्या आगीत आठ वर्षाच्या बालकाचा होरपळून मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय आगीत दोन शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. सोबतच संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडून राखरांगोळी झाली. सोमवारी (२२ एप्रिल) मध्यरात्री ही घटना घडली.

दीपक भाऊसाहेब वारे असे आगीत मृत झालेल्या बालकाचे नाव आहे. राजू सोन्याबापू मधे (वय ४०), चांगदेव राजू मधे (वय ६), भाऊसाहेब सुधाकर वारे (वय ३५) व शिवानी संदीप खंडागळे (वय ५), असे चार गंभीर जखमी झाले. जखमीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. डॉ. पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्यालगत असलेल्या सुनील बाबुराव देवकर यांचे शेतीमध्ये चार शेतमजूर कुटुंब राहातात. सोमवारी (२२ एप्रिल) मध्यरात्री या चारही कुटुंबातील सुमारे २२ जण गाढ झोपेत असताना छपरावरील लोंबत असलेल्या वीजतारांचे घर्षण होऊन त्यातून आगीचे लोळ या छपरावर पडल्याचे जळीत कुटुंबीयांनी सांगितले. वार्‍यामुळे आग घुमसत जावून वेगाने पसरली गेली. सदर कुटुंबियांना याची जाणीव होताच ते घराबाहेर पळाले. मात्र, या चारही कुटुंबातील १२ लहान मुले घरात अडकली होती. त्यांना आगीच्या ज्वालांमध्ये घुसून काहींनी बाहेर काढले.

- Advertisement -

आगीमध्ये कुटुंबीयांकडे असणारी सुमारे २५ हजार रुपयांची रक्कम जाळून खाक झाली. सोबत घरासमोर बांधलेल्या दोन शेळ्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. घरात असणारे महिलांचे सोन्या-चांदीचे काही किरकोळ दागिने आगीत भस्मसात झाले. तसेच घरातील संसार उपयोगी साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडल्याने मातीमोल झाले. छपराच्या पत्र्याखाली एक आठ वर्षीय बालक अडकले होते. त्यास मात्र बाहेर काढण्यात अपयश आल्याने राहुल वारे याचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबातील महिला व सदस्यांना वाचविताना चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वीज अधिकारी फिरकलेच नाही

घटनेनंतर लोणी पोलीस व तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. सदर घटना शॉर्टसर्किटने घडली असताना मंगळवार दुपारपर्यंत महावितरण कंपनीचा एकही अधिकारी दुर्घटनेच्या ठिकाणी फिरकला नव्हता. येथील ग्रामस्थांनीच या कुटुंबाला आधार देत त्यांच्या मदत केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -