घरमहाराष्ट्रनाशिकरद्द झालेल्या नाटकाचे डिपॉझिट परत मिळणार

रद्द झालेल्या नाटकाचे डिपॉझिट परत मिळणार

Subscribe

पठारे, पाटकर इम्पॅक्ट; महासभेत सादर होणार सुधारित प्रस्ताव;

रद्द केलेल्या नाटकाचे भाडे आणि अनामत महापालिकेने गिळंकृत केल्यामुळे अभिनेत्री सुप्रिया पठारे आणि विजय पाटकर यांनी रविवारी (ता. २५) रौद्रावतार धारण केला होता. त्यामुळे जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने आता नियमावलीत बदल करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्या अंतर्गत यापुढील काळात नाटक रद्द झाल्यास आकारलेले भाडे परत देण्यात येणार नाही. मात्र अनामत रक्कम परत देण्याबाबत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सकारात्मकता दाखविली आहे. यासंदर्भात महासभेत सुधारीत प्रस्ताव सादर करुन तो मंजूर केला जाणार आहे. दरम्यान, महापौरांनीही यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत सादर करण्याचे प्रशासनास आदेशित केले आहे.

नक्की काय होता वाद येथे वाचा

कालिदास कलामंदिरातील अव्यवस्थेबाबत सातत्याने चर्चा होत असते. त्यात आता सुप्रिया पठारे आणि विजय पाटकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी भर घातली. पठारे आणि पाटकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘दहा बाय दहा’ नाटकाचा प्रयोग कालिदास कलामंदिरात १२ जुलैला आयोजित करण्यात आला होता. परंतु तत्पूर्वी पठारे यांची प्रकृती बिघडल्याने हा नाट्यप्रयोग रद्द करण्याची वेळ आली. अशा वेळी काही रक्कमेत कपात करून उर्वरित शुल्क आणि भरलेली अनामत रक्कम संबंधितांना परत देणे गरजेचे होते. मात्र, कालिदासच्या व्यवस्थापकांनी नियमावलीकडे अंगुलीनिर्देश करत पैसे देण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, याच वेळी ठाण्याचा नाट्यप्रयोगही रद्द करण्यात आला होता. मात्र, ठाण्यातील रंगायतने भाड्यातील अर्धी रक्कम कापली. उर्वरित रक्कमेबरोबर अनामत रक्कमही परत दिली. कालिदास कलामंदिराच्या बाबतीत मात्र या कलाकारांनी उलट अनुभव आला. नाशिकमध्ये ‘दहा बाय दहा’ नाटकाचा प्रयोग रविवारी (दि. २५) झाला. या प्रयोगासाठी आलेल्या पठारे आणि पाटकर यांनी नाट्यगृहाबाबत बनवलेल्या नियमावलीवर माध्यमांशी बोलताना प्रचंड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता जाचक नियमावलीत सुधारणा करण्याचे प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरु झाले आहेत.

- Advertisement -

आयुक्तांच्या अधिकारात अनामत परत मिळणे शक्य-

महापालिकेच्या नियमावलीत रद्द केलेल्या नाटकाची अनामत रक्कम परत करण्याबाबत कोणतीही तरतूद नसली तरीही याच नियमावलीत अखेरची तरतूद सर्व प्रश्नांचे निराकरण करणारी आहे. यात म्हटले आहे की, नियमावलीबाबतचे अंतीम अधिकार आयुक्तांचे आहे. या नियमाच्या आधारे जर अनामत रक्कम वा तत्सम अडचणींसंदर्भात लेखी स्वरुपात तक्रार केली तर समस्येचे निराकरण होऊ शकते. मात्र महापालिकेचे अधिकारी या शेवटच्या तरतुदीविषयीची माहितीच नाट्य व्यावसायिकांना देत नसल्याचे लक्षात येते.

पुढील महासभेत सुधारित नियमावली सादर करण्याचे आदेश दिले

खरे तर महासभेची मान्यता न घेताच नाट्यगृहासाठी जाचक नियमावली तयार करण्यात आली होती. कलाकारांना जर या नियमांचा त्रास होणार असेल तर पुढील महासभेत सुधारित नियमावली सादर करण्याचे मी प्रशासनाला आदेशित केले आहे. – रंजना भानसी, महापौर, महापालिका

- Advertisement -

केवळ भाडे आकारुन अनामत रक्कम संबंधितांना परत देण्याची सुधारित तरतूद करता येईल

नाटकांची नोंदणी करुन ठेवली जाते. मात्र नाटक अचानक रद्द झाल्यास संबंधित तारखेला अन्य नाटक वा अन्य कार्यक्रमाची नोंद होईलच याची शाश्वती नसते. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊ शकते. या पार्श्वभूमीवर नियमावली बनवण्यात आली. मात्र त्यात काही बदल कलाकारांनी सुचविले आहे. त्यानुसार केवळ भाडे आकारुन अनामत रक्कम संबंधितांना परत देण्याची सुधारित तरतूद करता येईल.  – राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -