संत निवृत्तीनाथ मंदिर कामाबाबत विश्वस्तांमध्ये मतभेत का?

अध्यक्षांनी ठेकेदारास दिले परस्पर पैसे; विश्वस्त नाराज

Sant Nivruttinath Maharaj

ज्ञानेश्वर महाले, त्र्यंबकेश्वर

येथील संत निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे काम सुरु असून त्यात कोणतीही बैठक न बोलवता ठेकेदारास तीन लाख रुपये देण्यात आले असल्याने विश्वस्त पुंडलिक थेटे, त्र्यंबकराव गायकवाड, पंडित कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मंदिराचे काम २ कोटी ५७ लाख रुपयाचे आहे. ठेकेदारास आतापर्यत एक कोटी ९२ लाख रुपये आतापर्यंत देण्यात आले आहेत. एकूण ५१ फूट कामापैकी ३५ फूट काम पूर्ण झाले आहे, तर १६ फुटाचे काम अपूर्ण आहे. विश्वस्त मंडळाने ठेकेदारास काम देताना त्यांच्याकडून मुदतीत काम करण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले होते. मात्र, विविध कारणाने ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण केले नाही. ठेकेदाराच्या विनंतीवरून त्यास ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ठेकेदाराने कळसापर्यंतचे काम पूर्ण करण्याचे लेखी लिहून दिले होते. मात्र, अद्याप काम पूर्ण नसताना अध्यक्ष व सचिवाने विश्वस्तांना विश्वासात न घेता ठेकेदारास ३ लाख रुपये देणे कितपत योग्य असल्याचा सवाल नाराज विश्वस्त यांनी व्यक्त केला आहे.

ठेकेदार दंड भरणार का?

संत निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे काम वेळेत पूर्ण न केल्याने त्यास वाढीव मुदत देऊन यापुढे कामास विलंब झाल्यास प्रत्येक महिन्यासाठी दहा लाख रुपये दंड भरण्यास पात्र राहणार असल्याचे ठेकेदार व विश्वत यांच्यात ठरले होते. आतापर्यंत ६५ लाख रुपये दंड आकारणी होत असल्याने ठेकेदाराने दंड भरण्याची अपेक्षा विश्वस्त पुंडलिक देणे यांनी व्यक्त केली आहे.

मी आता ओंकारेश्वरकडे आहे. प्रत्यक्ष भुतडा यांच्याशी आल्यावर बोलणार आहे. तिडके यांना तीन लाख रुपये दिले कि नाही याची पूर्ण माहिती अजून मला मिळालेली नाही. फक्त त्यांना पैसे द्यायचे का, असा झोले यांचा मोबाईल होता. त्यावर मी भुतडा यांचा मोबाईल आल्यावर त्यांच्याशी बोलतो असे सांगितले होते. त्यानंतर यासंदर्भात भुतडा यांचा याविषयी फोन अजून तरी आलेला नाही.
– पंडीत कोल्हे, विश्वस्त