घरमहाराष्ट्रनाशिकतोट्यात रुतलेल्या ’बीएसएनएल’चे ’डिस्कनेक्टिंग इंडिया’

तोट्यात रुतलेल्या ’बीएसएनएल’चे ’डिस्कनेक्टिंग इंडिया’

Subscribe

महावितरणचे ५२ कोटी थकवले, महाराष्ट्रातील अनेक टेलिफोन एक्सचेंज बंद

’इन्कमिंग फ्री’ करत १६ वर्षांपूर्वी दिग्गज मोबाईल कंपन्यांना आव्हान देत सर्वसामान्य ग्राहकांना कनेक्ट केलेल्या ’बीएसएनएल’वरच आता डिस्कनेक्ट व्हायची वेळ आली आहे. दिवसेंदिवस वाढता कर्जाचा बोजा आणि आडमुठे सरकारी धोरण यामुळे कंपनीचा अस्तित्त्वासाठी लढा सुरू आहे. महावितरणची ५२ कोटींची थकबाकी भरली न भरल्याने बीएसएनएलचे महाराष्ट्रातील शेकडो मोबाईल टॉवर आणि टेलिफोन एक्सचेंज बंद आहेत.

बीएसएनएलच्या पायाभूत सुविधांचा वापर करत खासगी मोबाईल सेवा देणार्‍या कंपन्या नफा कमावत असताना, खुद्द बीएसएनएलचे पाय मात्र तोट्याच्या गाळात रुतत चालले आहेत. त्याचा थेट परिणाम फेब्रुवारी व जुलै महिन्यातील लांबलेल्या वेतनातून दिसून आला. मुंबईतील बीएसएनएलच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे महावितरणची वीजबिलांपोटी असलेली थकबाकी भरायलाही पैसे नसल्याने, ही रक्कम आता ५२ कोटींवर पोहोचली आहे.

- Advertisement -

२००७ पर्यंत कंपनी दरवर्षी सरासरी ५ ते १० हजार कोटींपर्यंत नफा मिळवत होती. मात्र, सरकारने स्वतःच्याच कंपनीकडे डोळेझाक केल्याने २०११-१२ मध्ये बीएसएनएलला ८ हजार ८५१ कोटींचा तोटा झाला. हे दृष्टचक्र एवढ्यावर थांबले नाही. कंपनीकडे स्वतःचा ४० हजार कोटींचा राखीव निधी होता, मात्र, सरकारने दुटप्पी भूमिका घेत स्वतःच्याच कंपनीच्या या निधीतून लायसन्स फी, थ्री-जी स्पेक्ट्रमचे शुल्क यापोटी १८ हजार कोटी रुपये वसूल केले. तेव्हापासून कंपनीला जी घसरण लागली, ती अद्याप थांबलेली नाही. परिणामी कर्मचार्‍यांच्या वेतनाला होणारा उशीर, यंत्रणांच्या खरेदीसाठी निधीची चणचण, ठेकेदारांची बिले अदा करण्यात असमर्थता आणि कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न उभा ठाकला आहे.

- Advertisement -

कोट्यवधींची मालमत्ता, तरीही हात रिकामे

देशभरात बीएसएनएलच्या स्वतःच्या हजारो कोटींच्या मालमत्ता आहेत. ज्यात केवळ टॉवर (बीटीएस) आणि टेलिफोन एक्स्चेंज कार्यरत आहे. या जागांचा व्यावसायिक वापर केल्यास तोटा भरून निघण्यास मोठा हातभार लागू शकतो. याबाबत सरकारनेच पुढाकार घेत बीएसएनएलला उर्जितावस्था प्राप्त करून देण्याची गरज आहे.

एअरटेलचा खर्च २.९५ टक्के, तर बीएसएनएलचा ७५.०६ टक्के

बीएसएनएलमध्ये ३१ मार्च २०१९ अखेर एकूण १ लाख ६३ हजार ९०२ कर्मचारी कार्यरत होते. त्यात ४६ हजार ५९७ अधिकार्‍यांचा समावेश आहे. कंपनीला जो महसूल प्राप्त होतो, त्यातील ७५.०६ टक्के हिस्सा हा या कर्मचार्‍यांवर खर्च होतो. या तुलनेत एअरटेल कंपनीकडे २० हजार कर्मचारी आहेत. त्यांच्यावर एकूण उत्पन्नाच्या अवघा २.९५ टक्के हिस्साच खर्च होतो. व्होडाफोनकडे ९ हजार ८८३ कर्मचारी असून, त्यांच्यावर एकूण उत्पन्नाच्या ५.५९ टक्के खर्च होतो.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -