घरमहाराष्ट्रनाशिकपुराच्या अनुभवांचे डॉक्युमेंटेशन

पुराच्या अनुभवांचे डॉक्युमेंटेशन

Subscribe

जिल्हाधिकारी सूरज मांढरे ः पूरस्थिती हाताळताना मदत होणार

यंदाच्या पावसाळ्यात नांदूरमध्यमेश्वर येथून २ लाख ९१ हजार क्युसेकने पाणीविसर्ग करण्यात आला. हा इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा विसर्ग आहे. पूरस्थितीचा अंदाज घेऊन जिल्हा प्रशासनाने महिनाभरापासून तयारी सुरू केली. विविध यंत्रणांमधील समन्वय, दारणापेक्षा गंगापूर धरणातून अधिक ठेवलेला विसर्ग आणि वेळोवेळी त्याबाबत ग्रामस्थांना सतर्क केले जात असल्याने महापूरस्थितीतही मोठी हानी टाळता आल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले. पूरस्थिती हाताळल्याच्या अनुभवाचे विविध यंत्रणांच्या सहकार्याने डॉक्युमेंटेशन करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

जून महिन्यात पाठ फिरवणार्‍या पावसाने सर्वांचीच चिंता वाढवली. धरणांनी तळ गाठला, तर चार्‍याअभावी पशुधनही धोक्यात आले. मात्र, जुलै अखेर धो धो बरसणार्‍या पावसाने मागील पन्नास वर्षांतील सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले. नांदूरमध्यमेश्वरमधून कधी नव्हे तो इतक्या मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. होळकर पूलाखालूनही ८४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. इतक्या मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने निफाड तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली, तर अनेक शेतकर्‍यांच्या शेतात पाणी शिरले. अनेकांचे संसार पुरात वाहून गेले हे खेदजनक असले तरी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रशासनाच्या विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला गेल्याने गोदाकाठच्या नागरिकांना तातडीने हलवण्यात आले.

- Advertisement -

आज सांगली, कोल्हापूर येथे निर्माण झालेल्या जलप्रलयाने राज्यातील आपत्कालीन व्यवस्थापनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. खरं म्हणजे पावसाळ्यापूर्वी आपत्तीचे नियोजन करणे आवश्यक असते तसे ते अनेक जिल्ह्यांमध्ये करण्यात आले देखील ऐन पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक ठिकाणी साहित्याची वानवा, काही ठिकाणी नियोजनाच उडालेला बोजवारा , अनेक जिल्ह्यांनी तर आपत्तीचा आराखडाच तयार केलेला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. काही ठिकाणी पाण्याचा विसर्ग करताना अंदाज चुकले, अनेक जिल्ह्यांमध्ये केवळ आराखड्याचे कागदी घोडे नाचवले गेले; परंतु नाशिक जिल्ह्यात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रत्येक विभागाला आपली जबाबदारी ज्ञात करून देत आपत्ती व्यवस्थापनाचा लघुकृती आराखडा तयार करत त्याद्वारे अंमलबजावणीचे आदेश दिले. परिणामी पूरजन्य परिस्थितीत यंत्रणांमध्ये समन्वय साधला गेल्याने नागरिकांना तातडीने सुचित करणे शक्य झाले व प्रशासनानेही संभाव्य धोके ओळखून नागरिकांना स्थलांतरित केले त्यामुळे जीवितहानी टाळता आली.

नाशिकमध्ये पुराने सर्व रेकॉर्ड मोडले, त्यामुळे या परिस्थितीत ज्या ज्या यंत्रणांनी भूमिका बजावली त्यांचे अनुभवाचे डॉक्युमेंटेशन करण्याचा मनोदय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार प्रत्येक विभागाकडून अनुभव लिखित स्वरुपात मागवण्यात आले असून त्याचे पुस्तक रुपात जतन करण्यात येणार आहे. याचा उपयोग भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाल्यास होऊ शकतो असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

भविष्यासाठी उत्तम ठेवा म्हणून जतन होईल

जिल्हाप्रशासन, मनपा, पोलीस, जलसंपदा विभाग आदी विभागांच्या समन्वयामुळे आपण पूरपरिस्थिती यशस्वीपणे हाताळू शकलो. प्रत्येक व्यक्तीने संवेदनशीलता दाखवून आपापली जबाबदारी पार पाडली. त्यामुळे हा अनुभवांचा एक ठेवा जर शब्दबद्ध केला, तर भविष्यासाठी तो उत्तम ठेवा म्हणून जतन करता येईल आणि पुढे तो कामी येऊ शकेल हा माझा प्रयत्न आहे. या साहित्याचे आपत्ती व्यवस्थापनात समावेश केला जाईल.  – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -