दिंडोरी मतदारसंघात डॉ. भारती पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष

Nashik

महाआघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात डॉ. भारती पवार यांचा पत्ता कट करून माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी बहाल डॉ. पवारांना बंडखोरी करण्यास भाग पाडले आहे. आघाडीचा उमेदवार निश्चित झाल्यामुळे डॉ. भारती पवार यांच्या गटात नाराजी पसरली. त्या आता काय भूमिका घेता याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे काही दिवसांपासून डॉ.भारती पवार नाराज होत्या. त्यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांची भेट घेतली. यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीविषयी चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. भाजपमध्ये येण्यापूर्वी त्यांना राजकीय ताकद दाखवण्याचे आवाहन केले. आपले राजकीय वजन दाखवण्यासाठी डॉ.पवार यांनी गुरुवारी कळवणला वाणी मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. अन्याय झाल्यास वेगळा पर्याय निवाडावा लागेल, अशी भूमिका जाहीर करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर पक्ष सोडण्याचा विचार करू, असे त्या सांगत असल्या तरी भाजपच्या उमेदवारीशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही.

बंडखोरी होऊ देणार नाही

डॉ. भारती पवार यांच्या उमेदवारीला घरातूनच विरोध होता. त्यामुळे एखादा विधानसभा मतदारसंघ बाजुला पडत असेल तर त्याविषयी पक्षाला गांभीर्याने विचार करावा लागतो. पारंपारिक लढतीपेक्षा तरुण उमेदवारांना संधी देण्याच्या विचारातून धनराज महाले यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, कोणत्याही परिस्थितीत डॉ. भारती पवार यांची बंडखोरी होऊ देणार नाही. आघाडीचे एकही मत बाहेर पडणार नाही. – आमदार छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस

तिरंगी लढत अटळ

आघाडीतर्फे डॉ.भारती पवार यांना उमेदवारी देण्याचा आग्रही असणारी माकप आता धनराज महाले यांच्या विरोधात स्वतंत्र उमेदवार देतील. त्यामुळे युती, आघाडी व माकपच्या उमेदवारांमध्ये तीरंगी लढत होणार आहे. तसेच बहुजन वंचित आघाडीने बापू बर्डे यांना तर आपने टी. के. बागुल यांना उमेदवारी दिल्याने मतांचे विभाजन होईल.

सर्व मतदार माझ्या व माझ्या पक्षाच्या पाठीशी

केंद्र, राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे. बेरोजगारीचा प्रश्न असो, शेतकर्‍यांचे प्रश्न असो किवा जनेतेला मुलभूत गरजा भागवण्याबाबत पाच वर्षात सरकारने डोळेझाक केली. हे प्रश्न सोडवण्याची संधी मला पक्षाने दिली आहे. माझे वडील (कै.) हरीभाऊ महाले यांच्या सामाजिक कार्याचा वसा पुढे चालवण्यासाठी आगामी निवडणुकीत पक्षाच्या विचाराशी बांधील राहून माझी वाटचाल सुरू राहील. सर्व मतदार माझ्या व माझ्या पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील असा विश्वास आहे. – धनराज महाले, उमेदवार, दिंडोरी मतदारसंघ

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here