घरमहाराष्ट्रनाशिकसुरत-हैदराबाद हायवेसाठी ‘ड्रोन’व्दारे सर्वेक्षण

सुरत-हैदराबाद हायवेसाठी ‘ड्रोन’व्दारे सर्वेक्षण

Subscribe

मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रीम’ प्रकल्प असणार्‍या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गानंतर सुरत-हैदराबाद आठ पदरी महामार्गासाठी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ७० गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे

मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रीम’ प्रकल्प असणार्‍या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गानंतर सुरत-हैदराबाद आठ पदरी महामार्गासाठी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ७० गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. या महामार्गासाठी शेतकर्‍यांचा विरोध विचारात घेता ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयात गत आठवड्यात सादरीकरण करण्यात आले.

देशभरात रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. त्या अंतर्गत साकारण्यात येणारा सुरत-हैदराबाद महामार्ग हा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर या सहा तालुक्यांतून जाणार आहे. याकरिता ‘आर्वी असोसिएट आर्किटेक्चर डिझायनर कन्सल्टंट ’ या कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. यापूर्वी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता शेतकर्‍यांनी केलेला विरोध विचारात घेता या महामार्गासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

माहितीचे संकलन

या महामार्गाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली तरी प्रशासकीय पातळीवर याबाबतची सर्व माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पासाठी किती शेतकर्‍यांची जमीन संपादित होणार, या महामार्गात शासकीय जमीन, घरे , बागायती जमीन, पीक परिस्थिती, गट क्रमांक यांबाबतची माहिती संकलित करण्यात आली आहे.

असा जाणार मार्ग

सुरगाणा तालुक्यातील करंजूल, ठाणगाव, बेडसे, गुरटेंभी, बार्‍हे, कोटंबी, भेंगु, कळमणे, पेठ तालुक्यातील पहुचीबारी, तोरणमाळ, करंजखेड, वीरमाळ, कलामबारी, काकडपाडा, वडबारी, जोगमोडी, हरणगाव, दिंडोरी तालुक्यातील गांडोळे, टेटमाळ, ननाशी, रणतोंडी, कवडासर, चिल्हारपाडा, महाजे, जालखेड, वाघाड, कोकणगाव बु., चाचडगाव, उमराळे, जांबुटके, नाळेगाव, इंदोरे, रासेगाव, पिंपळनारे, रामशेज, आंबेदिंडोरी, ढकांबे, शिवनई, वरवंडी, नाशिक तालुक्यातील आडगाव, ओढा, विंचुरगवळी, लाखलगाव, चेहडी खुर्द, चाटोरी, वर्‍हे, दारणा, लालपाडी, रामनगर, दारणा सांगवी, सावळी, तळवाडे, पिंपळगाव निपाणी, शिंपी टाकळी, सिन्नर तालुक्यातील देशवंडी, पाटपिंप्री, निमगाव, देवपूर, खोपडी बुद्रुक, धारणगाव, फर्दापूर, पांगरी बुद्रुक, भोकणी, पांगरी, मर्‍हळ, कहांडळवाडी, घोटेवाडी, वावी या गावांमधून हा महामार्ग जाणार आहे.

- Advertisement -

अधिकार्‍यांची नियुक्ती

या महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात नाशिक आणि सिन्नर तालुक्याकरीता उपजिल्हाधिकारी स्वाती थविल, निफाड, सिन्नरसाठी निफाडचे उपविभागीय अधिकारी महेश पाटील, पेठ, सुरगाणा तालुक्यांसाठी सुरगाणा उपविभागीय अधिकारी पंकज आशियाना, तर दिंडोरी तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -