घरमहाराष्ट्रनाशिकरात्रभर जागूनही मिळते हंडाभर गढूळ पाणी

रात्रभर जागूनही मिळते हंडाभर गढूळ पाणी

Subscribe

गळवड, दाडीची बारीसह; १५ ते २० गावांतील विदारक स्थिती

सुरगाणा तालुक्यापासून 13 किमी अंतरावर असलेल्या गळवड या गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून महिला, पुरुष व तरुण-तरुणी पाणी शोधण्यासाठी रानोमाळ वणवण भटकत असल्याचे विदारक चित्र बघावयास मिळत आहे. अगदी रात्रभर जागून कुठून तरी हंडाभर पाणी आणायचे, तेही दूषित.. ज्यामुळे तहान भागतेय खरी मात्र आजारांनाही आमंत्रण मिळतेय. अशी व्यथा असताना टँकर मात्र प्रशासकीय नियोजनशून्यतेच्या गर्तेत अडकल्याचे भयावह वास्तव आहे.

सद्यस्थितीत सुरगाणा तालुक्यात झुडीपाडा, म्हैसमाळ, शिरीश पाडा, जामनेमाळ, गळवड, मोरडा, गावितपाडा, शिवपाडा, साजोळे, दाडीची बारी, सुकापूर, पळशेत, देवळा, म्हैसमाळ, खडकिपाडा, खडकमाळ, गणेशनगर या गावांचे प्रस्ताव सुरगाणा पंचायत समितीत आले असून उर्वरित प्रस्ताव येणे बाकी असल्याचे पाणीपुरवठा टंचाई शाखा रफिख शेख यांनी सांगितले. या गावांपैकी म्हैसमाळ, शिरीश पाडा, जामनेमाळ, गळवड, मोरडा अशा काही गावांना टँकर मंजूर असून बाकीच्या गावांना मंजुरीची प्रतीक्षा आहे. सध्या सुरगाणा तालुक्यात 22 ते 25 गावांवर तीव्र पाणीटंचाई आहे. सर्वच ग्रामस्थांना २४ तास पाण्यासाठी झगडावे लागत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हंडाभर पाण्यासाठी रात्री तीन ते चार वाजेपासून जागरण करून, विहिरीवर रात्रभर जागून काढावी लागत आहे. मुक्या जनावरांचीही स्थिती वेगळी नाही. त्यांचाही पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. गळवड हे गाव उंच डोंगरावर असून त्याच्या चहूबाजूंनी पाणी अडवण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे. या गावाला तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असतानाही अद्याप टँकर पोहोचले नाहीत. दुषित पाण्यामुळे पोटदुखी, ताप, खोकला असे विविध आजार डोके वर काढत आहेत. या टंचाईग्रस्त गावात छोटे-मोठे पाझर तलाव व्हावेत, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, तत्काळ टँकरची व्यवस्था करावी अन्यथा सुरगाणा पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा त्रस्त नागरिकांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -