कांद्याच्या घसरणीला ब्रेक, मात्र कोट्यवधींचा फटका

गेल्या सात दिवसांत कांदा उत्पादकांना एकापाठोपाठ एक धक्के

Onion Lasalgaon Market
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेला कांदा

दिवाळीच्या तोंडावर लासलगाव येथील मुख्य बाजार आवारावर ३४०० रुपयांवर कांदा दर स्थिर झाले जरी असेल, तरी गेल्या सात दिवसांमध्ये कांदा दरामध्ये २२०० रुपयाची प्रतिक्विंटलमागे मोठी घसरण झाल्याने दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसलेला आहे. सातत्याने कांद्याच्या बाजारभावात होत असलेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत.

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढते कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आधी निर्यात बंदी, व्यापार्‍यांवर प्राप्तिकर विभागा मार्फत छापे मारणे, परदेशातून कांदा आयातीला परवानगी देणे आणि साठवणुकीवर 25 टनापर्यंत निर्बंध घातले तरीही कांद्याच्या बाजारभावात वाढ होत असल्याने विदेशातून मोठ्या प्रमाणात कांदा आयातीला परवानगी दिल्यामुळे कांद्याची आयात सुरू झाली आहे. तसेच देशांतर्गत नवीन लाल कांद्याची ही आवक बाजार समित्यांमध्ये दाखल होत असल्याने बाजार भाव कोसळले आहे. यामुळे कांदा उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. येथील बाजार समिती ११८ वाहनातून १३१० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्याला कमाल ४१७१ रुपये, सर्वसाधारण ३४०१ रुपये तर किमान ९०० रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजारभाव मिळाला.

नाफेडने शेतकर्‍यांचा कांदा खरेदी करावा

नाफेडच्या माध्यमातून १५ हजार टन कांदा आयात करून ५ हजार रुपये क्विंटल दराने खरेदी होणार आहे. यामुळे राज्यातील कांद्याचे भाव पडून कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्याऐवजी नाफेडने राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमधूनच कांदा ५ हजार रुपये क्विंटल दराने खरेदी करावा आणि कांदा उत्पादकांचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

यंदा ग्राहकांची दिवाळी होणार गोड

देशातील कांद्याच्या वाढत्या भावांना आळा घालण्यासाठी आयात केलेल्या 15 हजार टन कांद्याच्या पुरवठ्याचा आदेश नाफेडने आज दिला आहे. या अतिरिक्त कांद्यामुळे देशातील बाजारपेठांत कांद्याचा पुरवठा वाढणार आहे. यामुळे पर्यायाने कांद्याचे भाव आटोक्यात येतील. कांद्याच्या भाववाढीने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना त्यामुळे दिवाळीच्या काळात दिलासा मिळणार आहे.

सरासरी भाव

२ नोव्हेंबर – ५३०० प्रति क्विंटल
३ नोव्हेंबर – ४००० प्रति क्विंटल
४ नोव्हेंबर – ३४०० प्रति क्विंटल
४ नोव्हेंबर – ३६५१ प्रति क्विंटल
६ नोव्हेंबर – ३२०० प्रति क्विंटल
६ नोव्हेंबर – ३४०१ प्रति क्विंटल