लक्ष्मीपूजनात ठेवले कांदे, केंद्राला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर कांदा पूजन करत आयात थांबवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

Lasalgaon Onion Puja

निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे व शोभा साठे या शेतकरी दाम्पत्याने दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर कांद्याचे पूजन केले. या दाम्पत्याने पूजनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत परदेशी कांदा आयात थांबवण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने परदेशातून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्यास परवानगी दिली. त्यामुळे देशांतर्गत कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली. त्याच पार्श्वभूमीवर परदेशी कांद्याची आयात थांबवण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात गांधीगिरी मार्गाने या दाम्पत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातीमोल भावाने विकल्या जाणार्‍या कांद्याच्या विक्रीतून आलेले ११६४ रुपयांची मनीऑर्डर केली होती. निफाड तालुक्यातील नैताळे गावातील संजय साठे व शोभा साठे या कांदा उत्पादक शेतकरी दाम्पत्याने ही मागणी केली आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर कांद्याचे पूजन करत या दाम्पत्याने मोदींकडे केलेल्या मागणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. आनंदात आणि उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. यंदा मात्र अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यातच परदेशातून मोठ्या प्रमाणात कांदा आयात होत असल्याने आठ हजार रुपयांपर्यंत कांद्याचे दर गेले आहेत. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर ३ हजार २०० रुपयांपर्यंत घसरल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कष्टाने पिकवलेल्या कांद्याला योग्य भाव मिळावा आणि झालेला खर्च व नुकसान भरून निघावा, यासाठी इजिप्त, इराक, इराण आणि तुर्की या प्रदेशातून होणारी कांद्याची आयात थांबवण्यास सांगितली आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर कांद्याचे पूजन केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत कांदा उत्पादक शेतकरी संजय व शोभा साठे दाम्पत्यानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घातले आहे.

नैताळे येथील संजय साठे या कांदा उत्पादक शेतकर्‍यांने २०१० साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मुंबई येथे जागतिक बदलते तापमान या विषयावर पाच मिनिटं भेट घेतली होती. नेहमीच शेतकर्‍यांसाठी अनोख्या गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार्‍या या कांदा उत्पादक संजय व शोभा साठे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कांदा आयात थांबवण्याची मागणी केली आहे, ही मागणी मान्य करत कांद्याची सुरू असलेली आयात थांबवणार का, याकडे आता कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. परदेशी कांदा मुंबईत आला आहे, तसेच देशांतर्गत बाजार समित्यांमध्येदेखील लाल कांद्याची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे. सणासुदीच्या काळात कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने कुटुंब कसे चालवावे आणि झालेला खर्च कसा काढावा, असा प्रश्न आता कांदा उत्पादकांसमोर उभा राहिला आहे. वेगवेगळ्या निर्बंधांमुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कांद्याला बाजारभाव मिळणे गरजेचे असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहेत.